उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य नाविन्यता स्टार्टअप धोरण 2018 च्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राज्यातील नाविन्यपुर्ण संकल्पना आणि नवउदयोजकांना प्रोत्साहन देण्यासाठी  “महाराष्ट्र स्टार्टअप” यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे आगमन काल दि.02 सप्टेंबर रोजी  शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9-30 वा झाले .

   या यात्रेचे स्वागत आणि कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते मोबाईल व्हॅनची फीत कापून करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाची माहिती घेऊन यात्रेचे आयोजकांशी संवाद साधला. जिल्हयातील तरुणांनी, नवउदयोजकांनी या यात्रेच्या माध्यमातून नवसंकल्पनाचे सादरीकरण करावेत. तसेच जास्तीत जास्त तरूणांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी राज्यशासन स्टार्टअप धोरणावर लक्ष्य केंद्रीत करत आहे. तरुण पिढींनी नोकरीच्या मागे न लागता शासनाच्या या उपक्रमात सहभाग घेउन स्वत:चे स्टार्टअप सुरू करावेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी  श्री. दिवेगावकर यांनी केले. 

  याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी  शिवकुमार स्वामी , कौशल्य विकासचे सहायक आयुक्त संजय गुरव, जिल्हा उदयोग केंद्राचे जावळीकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे यासेरोद्दीन काझी, पॉलीटेक्नीकचे प्राचार्य अधांरे, तेरणा इंजिनिअरींगचे प्राचार्य माने, विदयापीठ उपपरिसरचे डॉ.अमृतराव, आयटीआयचे जाधव, माविमचे श्रीमती.कुलकर्णी मॅडम, एमसीईडीचे मोरे, एमएसआरएलएमचे  जोगदंड, तेरणा इंजिनिअरींगचे माने, आदी मान्यवरांसह प्रशिक्षण संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  या यात्रेद्वारे शहरातील आर.पी.कॉलेज, गर्व्हमेंट आयटीआय, गर्व्हमेंट पॉलीटेक्नीक आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ उपपरिसर या ठिकाणी भेट देऊन मोबाईल व्हॅनद्वारे स्टार्टअप यात्रे संदर्भात माहिती देऊन जास्तीत जास्त विदयार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

 शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे. उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या 134 युवकांना 10 हजार रुपयांपासून एक लाखांपर्यंतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत. यात कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई - प्रशासन आणि इतर अशा विषयातील नवनवीन संकल्पना, स्टार्टअप्सना पारितोषिके दिली जाणार आहेत. राज्यस्तरावर एकूण 26 विजेत्यांची निवड केली जाईल. जिल्ह्यांमध्ये उत्तम तीन विजेत्यांना 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार अशी पारितोषिके देण्यात येतील. विभागस्तरावर सहा सर्वोत्कृष्ट नवउद्योजक आणि सहा सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर 14 विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक एक लाख रुपये, तर द्वितीय पारितोषिक 75 हजार रुपये आहे. रजिस्ट्रेशन आणि अधिक माहितीसाठी, www.mahastartupyatra.in / www.msins.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यानूसार लवकरच नोंदणीकृत उमेदवारांचे जिल्हास्तरीय सादरीकरणाचे वेळापत्रक जाहिर करण्यात येणार आहे. 


 
Top