उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जनावरांमध्ये आढळून आलेला लंपी स्किन रोग हा राजस्थान,पंजाब,मध्य प्रदेशातून गडचिरोली जिल्ह्यातून महाराष्ट्रात आलेला आहे. या रोगाविषयी पशुपालकांनी कोणत्याही अफवांना बळी पडून घाबरून जाऊ नये.आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.या रोगाचा प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

     लंपी स्किन आजाराबाबत जाधव आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.यतीन पुजारी यांनी माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली. 

     जनावरांच्या गोठ्यामध्ये धूर,फवारणी आणि कीटकनाटकांचा वापर करून डास,चिलट आणि गोमाशा यांचा नायनाट करता येणार आहे.

     उस्मानाबाद जिल्हा परिषदेने उपाययोजना म्हणून 80 हजार प्रतिबंधक लस खरेदी केलेली आहे.यापैकी 15 हजार खर्च केले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा,कळंब भूम,परंडा आणि लोहारा या पाच तालुक्यामध्ये 13 जनावरे आढळून आली होती. या जनावरांवर उपचार होऊन आता ही जनावरे तंदुरुस्त झाले आहेत. .        केवळ गोवंशीय जनावरांना हा आजार होत असून शेळ्या मेंढ्यांना याची लागण होत नाही.

      जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये यासंदर्भात ग्रामसभा घेण्यात येऊन नागरिकांबरोबर पशुपालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. याकरिता गावागावातील ग्रामपंचायत,मंदिराच्या ध्वनिक्षेपकावरून तर गावातील दर्शनी भागात फ्लेक्स बोर्ड लावून नागरिकांना पशूंच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. ग्रामसेवकांना या जनजागृती मोहिमेसाठी प्राधान्याने जागृत राहण्याचे सूचित करण्यात आलेले आहे.

     नागरिकांनी या काळामध्ये आपल्या जनावरांना सार्वजनिक ठिकाणी घेऊन न जाता स्वतंत्ररित्या त्यांची खाणीपिण्याची देखभाल करावी.

     जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मार्फत लक्षणे दिसणाऱ्या जनावरांची मोफत तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत.तर खाजगी रुग्ण देखभाल करणाऱ्या डॉक्टरांची देखील या कामी मदत घेतली जाणार आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन केलेली आहे तसेच टोल फ्री क्रमांक वरून देखील आवश्यक ती मदत पशुपालकांना केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले.असे यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. येतीन पुजारी यांनी सांगितले.


 
Top