उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठा समाजाला आजपर्यंत टिकाऊ आरक्षण दिलेले नाही. त्यांना आरक्षणासाठी अजूनही वाटच बघावी लागत आहे. मागच्या सरकार प्रमाणे आम्ही आश्वासन देणार नाही तर २०२४ च्या आत मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही खरे पाईक आम्ही आहोत. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचा अधिकार नसून त्यांच्या विचारांना आम्हीच पुढे घेऊन जाणार आहोत. कारण आमची बांधिलकी स्व बाळासाहेब ठाकरे व शिवसेना व शिवसैनिकांशी आहे. खरी शिवसेना कोणाची आहे यावर कोणीही दवा करू नये. आम्ही उद्याच्या मुंबई येथील दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाजत गाजत शिवसैनिक आणून खरी शिवसेना कोणाची आहे ? हे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून देऊ अशी गर्जना आरोग्य मंत्री तथा शिवसेना नेते डॉ तानाजीराव सावंत यांनी हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क अभियान कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी दि.२४ रोजी केली.

दरम्यान, शेकडो शिवसैनिक, काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. 

 उस्मानाबाद येथील पुष्पक पार्क येथे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) च्यावतीने हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क अभियान, कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दि.२४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा संपर्कप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंके, धनंजय सावंत, मोहन पणुरे, बाबा चेडे, संजय गाढवे, सुलतान शेख, अजित लाकाळ, बळी सुरवसे, संभाजी भडंगे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. सावंत म्हणाले की, शिवसैनिकांच्या मेळाव्याचे स्वरूप काय असते हे तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथे घेतलेल्या मेळाव्यात दाखवून दिले आहे. मी पोट तिडकीने शिवसैनिकांशी संपर्क साधत असून सत्तेचा ताम्रपट कायम कोणाचाही नसतो असे सांगत ज्यांनी लाठ्या-काठ्या खाल्ल्या त्यांच्या भावनांचा आदर व्हायला हवा होता. तसेच २०१९ ची निवडणूक भाजप शिवसेना यांनी एकत्र लढली. जनतेने त्यांना बहुमत दिले. मात्र जनमताचा आदर न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. हे आम्हाला व शिवसैनिकांना अजिबात आवडले नव्हते. त्यामुळे आमचा व शिवसैनिकांचा स्वाभिमान मातीत मिळू देणार नसल्याचे सर्वप्रथम मी उद्धव ठाकरे यांना मातोश्री सोडताना सांगितले होते. ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही शिवसैनिक व जनतेसाठी काय केले असा प्रश्न विचारीत शिवसैनिकांनी फक्त जय भवानी जय शिवाजी करायचे हे यापुढे चालणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळेच आम्ही सत्ता पालट केली असून यापुढे सर्व कामे शिवसैनिकांनाच मिळतील कोणत्याही नेत्याच्या नातेवाईकाला दिली जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या मेळाव्यास जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top