उस्मानाबाद / प्रतिनिधी-
विकासकामांमध्ये निधी अभावी कुठलीही कामे रखडली जाऊ नये याची तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी काळजी घ्यावी. विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी आज येथे केले.
डॉ.सावंत आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी परांडा, भूम आणि वाशी या तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये सर्व तालुकास्तरीय अधिकारी पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले-डंबे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, भूम-परांडा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, वाशीच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील, भूमच्या तहसीलदार उषाकिरण शृंगारे, परांड्याचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर, वाशीचे तहसीलदार नरसिंग जाधव तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री महोदयांनी परांडा तालुक्यातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत मुख्याधिकारी यांना निर्देश दिले तसेच तालुक्यातील आरोग्य आणि स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्याकडे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. येणाऱ्या आठ-दहा दिवसांत पुन्हा सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तयारी ठेवावी. या कालावधीत कोणतीही रजा मंजूर करण्यात येऊ नये असे आदेशही डॉ.सावंत यांनी यावेळी दिले.
भूम तालुक्याच्या तहसील कार्यालयात आयोजित बैठकी दरम्यान आरोग्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले की, मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा येणार आहे आणि यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये जनता दरबार घेणार आहे. या दिवशी नागरिक आपली निवेदने सादर करतील आणि याच दिवशी 80 टक्के निवेदनांवर कार्यवाही करावी आणि उरलेली कामे पुढील 15 दिवसांत अधिकारी वर्गाने सकारात्मकरित्या करण्याचे प्रयत्न करावेत.
वाशी तालुक्यातील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत डॉ.सावंत यांनी 2021 साली घेतलेल्या जनता दरबारात दिलेल्या सूचनांचा अनुपालन अहवाल सादर करण्याबाबत तहसीलदार नरसिंग जाधव यांना सूचित केले. ते म्हणाले की यापुढे माझ्या कार्यक्रमामध्ये कार्यालयांची अचानक भेट आणि दफ्तर तपासणी असणार आहे. तेंव्हा कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील रखडलेली सर्व कामे विहित मुदतीत करण्याचे प्रयत्न करावेत. लवकरच वाशी तालुक्याच्या वीज समस्या सोडविण्यासाठी वीज उपकेंद्र उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार. या उपकेंद्रसाठी जमीन उपलब्ध करणे आणि शासकीय मान्यता घेण्याचेही प्रयत्न करणार. या उपकेंद्रामुळे तालुक्यातील 90 टक्के समस्यांचे समाधान होईल, असेही डॉ.सावंत यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा सविस्तर आढावा लवकरच घेण्यात येणार आहे. तेंव्हा सर्व अधिकाऱ्यांनी अद्ययावत माहिती आणि कार्यअनुपालन अहवाल तयार ठेवावेत, असेही डॉ.सावंत यावेळी म्हणाले.