उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथील श्री सिध्दीविनायक अ‍ॅग्रीटेक इंडस्ट्रीज लि. या कारखान्याचा सन २०२२-२३ चा प्रथम गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा शुक्रवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला. श्रीमती मीनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते मशिनरीचे विधिवत पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

 तुळजापूर तालुक्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची गैरसोय लक्षात घेऊन नांदुरी-धोत्री रस्त्यावर देवकुरळी शिवारात सिध्दीविनायक परिवारचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी श्री सिध्दीविनायक अ‍ॅग्रीटेक इंडस्ट्रीजची मुहुर्तमेढ रोवली. अवघ्या आठ महिन्यात कारखान्याचे काम पूर्ण करुन जानेवारी २०२२ मध्ये कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम यशस्वी केला. गतवर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झालेला असताना चाचणी हंगामातही कारखान्याने ६१ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करुन परिसरातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला होता.

 यावर्षीच्या पहिल्या गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असून शुक्रवारी विधिवत पूजन करुन  बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. चेअरमन श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री मीनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते मशिनरीचे पूजन करुन बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.

 यावेळी बोलताना चेअरमन श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार, ऊसतोड कामगारांनी आपलाच कारखाना समजून काम करावे, असे आवाहन करुन कारखान्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाला जास्तीत जास्त भाव देणार असल्याचे सांगितले. चाचणी हंगामात केवळ तीन महिने कारखान्याने गाळप केले असून कर्मचार्‍यांनी केलेल्या अहोरात्र मेहनतीमुळे ६१ हजार मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट गाठू शकलो असल्याचेही ते म्हणाले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. प्रतीक देवळे यांनी तर आभार मुख्य अभियंता हरी सिरसाठ यांनी मानले. सोहळ्यास व्यंकटेश कोरे, अ‍ॅड.नितीन भोसले, हर्षद कुलकर्णी, राहुल काकडे, सुजित साळुंखे, सिध्दीविनायक मल्टीस्टेटचे सीईओ राजेश जाधव, अरविंद गोरे, रामचंद्र सारडे यांचेसह ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top