उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेना सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आजही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. कधी अमिषे ऑफर देत आहेत तर कधी दबाव टाकून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचा गौप्यस्फोट उस्मानाबाद व कळंब मतदार संघांचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. कितीही ऑफर आल्या दबाव आला तरी शिवसेना सोडणार नसल्याचा खुलासा आमदार पाटील यांनी केला. आजही काही सहकारी आमदार यांच्यामार्फत निरोप येतात, सगळेच निरोप जाहीर सांगायचे नसतात असे सांगत त्यांनी काय ऑफर व निरोप दिला जात असल्याचे संकेत त्यांनी दिले. 

तुळजापुर येथे युवा सेनेच्या मेळाव्यात बोलताना आमदार कैलास पाटील यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला यावेळी युवासेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई, खासदार ओमराजे निंबाळकर हे उपस्थित होते. शिवसेनेने आम्हाला ओळख दिली, उमेदवारी तिकीट दिले त्यामुळे आम्ही खुर्चीवर बसू शकलो. सर्वसामान्य जनता व शिवसैनिक यांच्या मतांवर आम्ही आमदार खासदार  लोकप्रतिनिधी झालो आहोत. शिवसेनेने आम्हाला ओळख करुन दिली आणि ज्यांनी ओळख करुन दिली त्यांच्याशी कधीही प्रतारना करायची नाही, कितीही अमिषे आली तरी मी व खासदार ओमराजे हे शिवसेना सोडणार नाही. काही नेते जरी सोडून गेले तरी सामान्य जनता शिवसेनेच्या व उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे व राहणार असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

 
Top