उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

बालसुधार गृहातील बालकांना बनावट आधारकार्डच्या आधारे पळवून नेणाऱ्या आंतरराज्य तस्कर टोळीचा उस्मानाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 बनावट आधारकार्ड जप्त केले आहेत. विशेष म्हणजे पळवून नेलेल्या बालकांकडून चोऱ्या व भीक मांगण्याचे काम केले जात होते, अशी माहिती पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पेलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांची उपस्थिती होती. 

  या टोळीचा छडा सपोनी अमोल पवार, पोउपिन संदीप ओहोळ, पोलिस अंमलदार साईनाथ् आशमोड, महिला पोलिस अंमलदार वैशाली सोनवने, रंजना होळकर यांच्या पथकाने लावला आहे. अशी माहिती पोलिस अधिक्षक  यांनी देऊन पुढे बोलताना ते म्हणाले की, उस्मानाबाद बालसुधारगृहातून मुलांचे आई-वडील असल्याचे भासवून मुलांची तस्करी केल्या जात असल्याचा प्रकार उघड आहे. आंधप्रदेशमधील एक टोळी बालसुधारगृहातील मुलांना घेण्याच्या बहाण्याने आली होती. या टोळीतील 3 जणांना अटक करण्यात आली आह. त्यांच्याकडून 5 बनावट आधार कार्ड आणि 5 मोबाईल जप्त केले आहेत.

चोरीच्या गुन्ह्यात पकडलेली अल्पवयीन मुले बालसुधार गृहात ठेवली जात होती. या मुलांचे पालक असल्याचा दावा ही टोळी बोगस आधारकार्ड बनवून करीत होती. त्यानंतर त्या बालकांना घेऊन पळवून जात होती. उस्मानाबाद शहरातील सांजा चौकातील बालगृहातील मुलाला बनावट आधार कार्ड ओळखपत्र आणि जन्मदाखला घेऊन आई म्हणून एस.लक्ष्मी कृष्णा, रा. कुरनूल, आंध्र प्रदेश ही महिला मुलाला घेण्यासाठी आली.  याबाबत पोलिसांनी तिला कांही प्रश्न विचारल्यानंतर समाधानकारक उत्तर न आल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. व सदर महिलेस ताब्यात घेतले. तिच्या मोबाईलवरून अधिक माहिती घेतली असता, तिचे दोन साथीदार शहरात असल्याचे समजले. पोलिसांनी त्या दोन साथीदार एस. कृष्णा उर्फ गंगाधार सुभाषराव व एस.साई व्यंकटेश ( दोघे रा.कुरनुर आंध्रदेश ) त्यांनाही ताब्यात घेतले.अधिक तपासानंतर दोन बनावट आधारकार्ड, चोरीचे पाच मोबाईल, बनावट वाहन परवान्यासह एक बोलेरो पिकअप पोलिसांनी जब्त केली. 

पाच दिवसाची पोलिस कोठडी 

या प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने तीघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावणी आहे. 


 
Top