उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  गेल्या अडीच वर्षात आघाडी सरकारमुळे जिल्ह्याचा विकास रखडलेला असून रेल्वे, वैद्यकीय महाविद्यालय, पीकविमा आदी  रखडलेले प्रश्न सोडिवले जातील आिण जिल्हयाचा विकास करण्यासाठी जलद गतीने प्रयत्न करणार असल्याचे ठाम प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.३ सप्टेंबर रोजी केले.

उस्मानाबाद येथील प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड, ॲड. खंडेराव चौरे, युवराज नळे, सुरेश देशमुख आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील बालिकेवर झालेला अत्याचार अतिशय गांभीर्याने घेतला आहे. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यासाठी विशेष तज्ञ वकिलांची नेमणूक करण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले आहे. त्या पिडित बालिकेला अत्यावश्यक असलेल्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या असून तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. तसेच त्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त झाले असून त्यांचे पालकत्व मी स्विकारले आहे. 


कृष्णा-मराठवाडा प्रकरणी लवकरच बैठक 

कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत ७ टीएमसी पाण्याच्या पलीकडे जाऊन बैठक लावण्याची प्रक्रिया केली. हे काम जलद गतीने सुरू होण्यासाठी जिओ टॅगिंन निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यासाठी पूर्ण ताकदीने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.


या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार ५० टक्के निधी देणार

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी मागच्या राज्य सरकारने ५० टक्के राज्याच्या वाट्याचा हिस्सा देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरावच घेतला नव्हता. त्यामुळे तो रखडला असल्याचा गंभीर आरोप केला. मात्र आमचे सरकार सत्तेवर आले असून ५० टक्के निधी देण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेऊन तो निधी सीएसआर म्हणजेच आकस्मित निधीतून उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात तुत्रींटीची पुर्तता करणार

उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या आवश्यक असलेल्या अटी व शर्ती पूर्ण करण्यास मागचे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या सर्व त्रुटींची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय आयुक्त रवींद्र सिंग यांना मुंबईत बोलावून घेतले असून उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड हे त्यांच्या समवेत परिपूर्ण प्रस्ताव तयार करीत असून तो उद्या दि.५ सप्टेंबर रोजी केंद्राकडे पाठविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रसाद योजनेसंदर्भात प्रस्ताव पाठवणार

प्रसाद योजनेचा प्रस्ताव मागच्या राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला नव्हता. या योजनेचा विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येऊन ३ महिन्यांच्या आतमध्ये केंद्रा सरकारकडे पाठविणार असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. 


टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारणार

उस्मानाबाद तालुक्यातील कौंडगाव येथील एमआयडीसी भागामध्ये टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून १० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हे पार्क आकर्षक होईल यादृष्टीने नियोजन साल चालू आहे. विशेष म्हणजे देशात कुठेही अशा प्रकारचे पार्क उभारलेले नाही. त्यामुळे देशातील पहिले पार्क उभे करण्याचा मान उस्मानाबादला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


रोहित्र बाबत एसएमएस द्वारे तक्रारी करा

विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांसह इतर ग्राहकांच्या देखील मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी लाईनमन अथवा संबंधित अभियंता भेटून सांगितले तरी ते दुरुस्त करून देत नाहीत. त्यामुळे यापुढे विद्युत पुरवठा तसेच डी.पी. (रोहित्र) बाबतीत शेतकरी व इतर ग्राहकांच्या तक्रारी असतील तर त्यांनी संबंधित लाईनमन अथवा उप अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याकडे एसएमएस व ईमेलद्वारे कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.

 
Top