उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच निकषपात्र अनुदानित शाळा, वर्ग आणि तुकड्यांसाठी प्रचलित अनुदान सूत्रानुसार अनुदान द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांमार्फत मोर्चेकर्‍यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविले.

मागील 20 ते 22 वर्षांपासून हजारो शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विना वेतन किंवा अल्प वेतनावर काम करीत आहेत. उच्चशिक्षित प्राध्यापक 15 ते 20 वर्षांपासून तासिका तत्वावर काम करीत आहेत. ही खेदाची बाब आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या हितासाठी जुनी पेन्शन योजना व शाळा, वर्ग व तुकड्यांना प्रचलित अनुदान सूत्रानुसार अनुदान मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांना 10, 20, 30 अशा तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी, भंडारा जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या नियुक्त्या स्वयंसेवक म्हणून करण्याचा केलेला ठराव रद्द करावा, शिक्षकांच्या पाल्ल्यांना अर्थसहाय्य करणारा मार्च 2021 चा शासनादेश रद्द करून मोफत शिक्षणाचा आदेश लागू करावा, संस्थांचे वेतनेत्तर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार देण्यात यावे, रिक्त पदे तत्काळ भरावीत, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करावी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांची आर.टी.ई देयके त्वरीत देण्यात यावीत, शिक्षक कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्यावतीने शहरातील शहर पोलीस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. निवेदनावर मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव, राजकुमार कदम, जयपाल शेरखाने, ए. बी. औताडे, फारूख जमादार, एस. एस. तीर्थकर, विक्रम मायाचारी, पी. एस. शिंदे, व्ही. जी. पवार, डी. के. भोसले, डी. एम. बनसोडे, सी. एन. माळी, जी. एच. देडे, एस. के. दराडे, व्ही. एस. पाटील, व्ही. बी. गायकवाड, एस. बी. डोके, एस. एस. विभुते यांची स्वाक्षरी आहे. 


 
Top