उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खोकी, पोती दिली तरी त्याच्यावर लाथ मारायची ताकद आमच्यात आहे, अशी घणाघाती टिका शिंदेगटाचे नांव न घेता, खा. ओमराजे निंबाळकर यांनी युवा सेनेच्या मेळाव्यात बोलताना केले. 

उस्मानाबाद शहरात युवा सेनेचा मेळावा युवा सेनेचे सरचिटणीस वरूण देसाई, आ.कैलास पाटील,  जिल्हा संपर्क प्रमुख अनिल खोचरे, महिला जिल्हाध्यक्षा शामलताई वडणे, जिल्हा उपप्रमुख विजय सस्ते, युवा सेनेचे विभागीय राज्य विस्तारक संजय कोळी, दत्ता बंडगर, विभागीय सचिव अक्षय ढोबळे, शहराध्यक्ष पप्पू मुंडे, राणा बनसोडे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी खासदार निंबाळकर बोलत होते. 

  प्रत्येक सिनेमा, सिरीयल व नाटकांमध्ये राजकारणी डाकू का दाखवितात ? हे आजपर्यंत समजले नव्हते. मात्र मागील ३ महिन्यापासून राज्यातील राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर ते समजले असे सांगून गद्दारी केलेल्या आमदारांना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. तुम्ही शिवसेना सोडून नेमके काय मिळवले ? हे मुख्यमंत्री शिंदे  यांना फेसबुकवरील आपला कॉमेंट बॉक्स चालू ठेवता येत नसेल तर याच्यातच सर्व काही आले असल्याचा प्रहार त्यांनी केला. तुम्ही खोके घ्या पेटी घ्या व गद्दारी करा परंतु शिवसेनेची गद्दारी व प्रार्थना करणे हे आम्हाला मान्य नव्हते. तसेच आमच्यावर मतदारांनी टाकलेला व त्या मतदारांचा मान ताठ मानेने राहील असे वागता आले पाहिजे म्हणून आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेने पान टपरीवाला टमटम चालक व सर्वसामान्यांना आमदार, खासदार व मंत्री केले. तर आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या‌ भाजप प्रवेशावर हल्ला करताना ते म्हणाले की, जिल्ह्याचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये गेल्याचे सांगितले गेले. तर मागील ३५ वर्ष पिता-पुत्रांनी जी सत्ता भोगली. त्यावेळी का विकास केला नाही ? असा टोला लगावला. 

 शिंदे गटातून आजही ऑफर, दबाव येतोय -  आ.  कैलास पाटील

शिवसेना सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आजही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. कधी अमिषे ऑफर देत आहेत तर कधी दबाव टाकून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचा गौप्यस्फोट उस्मानाबाद व कळंब मतदार संघांचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. कितीही ऑफर आल्या दबाव आला तरी शिवसेना सोडणार नसल्याचा खुलासा आमदार पाटील यांनी केला. आजही काही सहकारी आमदार यांच्यामार्फत निरोप येतात, सगळेच निरोप जाहीर सांगायचे नसतात असे सांगत त्यांनी काय ऑफर व निरोप दिला जात असल्याचे संकेत त्यांनी दिले. 

  २०२४ साली प्रधानमंत्री पदाचे दावेदार होतील भाजपला भिती-देसाई

 शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होत होता. त्यातच कोरोनाचे संकट यशस्विरित्या हाताळणाऱ्या देशातील मुख्यमंत्र्यांमध्ये ते प्रथम क्रमांकाचे होते. विशेष म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी असताना त्यांना दोन सेक्युलर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. ते जर ५ वर्ष मुख्यमंत्री राहीले असते तर त्यांचा चेहरा २०२४ साली प्रधानमंत्री पदासाठीच पुढे येईल या भीतीपोटीच भाजपने शिवसेनेचे आमदार फोडले असल्याचे टिकास्त्राचे घणाघाती व जिव्हारी लागणारे जहरी बाण युवा सेनेचे प्रदेश सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी  थेट भाजपवर सोडले. 

  प्रस्ताविक अक्षय ढोबळे यांनी तर उपस्थितीचे आभार मनीषा वाघमारे यांनी मानले. 

 
Top