उस्मानाबाद /प्रतिनिधी-

जिल्हा अनुदानातून वगळला ही अफवा..आता आपले सरकार, मदत मिळणारच, अशी माहिती भाजपचे  आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

ज्या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेले आहे म्हणजेच शासकीय निकषांप्रमाणे 24 तासात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अशा तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, कळंब तालुक्यातील येरमाळा,मोहा, उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, डाळिंब, मुळज, उमरगा व परंडा तालुक्यातील जवळा (नि) या महसूल मंडळातील 75,739 शेतकर्‍यांना 90.74 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे. सदरील अनुदान हे राज्य/राष्ट्रीय आपत्ती निवारण निकषांनुसार दिल्या जाणार्‍या अनुदानापेक्षा दुप्पट दराने देण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर नुकसानीच्या व्याप्तीची मर्यादा देखील 2 हेक्टर वरून 3 हेक्टर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 शिंदे-फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून सततच्या पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेता विशेष बाब म्हणून अनुदान देण्यात येणार आहे. तसा शब्द मुख्यमंत्री .एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेत दिला आहे.  नैसर्गिक आपत्ती मुळे 33% पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाल्यास, शासकीय मदत मिळणे अनिवार्य असते.

 सततच्या पावसामुळे तसेच गोगलगाईच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने जिल्ह्यातील 1,10,000 हेक्टर बाधित क्षेत्राचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व तालुक्यांचा समावेश आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी प्रमाणेच या शेतकर्‍यांना देखील अनुदान देण्याची प्रक्रिया चालू आहे. सततचा पाऊस व गोगलगायींचा प्रादुर्भाव यामुळे झालेले नुकसान हे शासकीय निकषांच्या बाहेर असल्याने खास बाब म्हणून हे करण्यात येत आहे.  33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे हे शासकीय मदतीसाठी अनिवार्य आहेत.  शेतकर्‍यांना आधार द्यायचा, त्यांना लवकर अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करायचा सोडून नेहमी प्रमाणे विकृत राजकीय मानसिकतेतून शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदरील अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील यावर विस्तृत चर्चा झाली आहे. अतिवृष्टी प्रमाणेच हे अनुदान देखील जिल्ह्यातील शेतकर्‍यांना लवकरच प्राप्त होईल, असे आश्वासन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले.

 
Top