उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्ह्यात श्री गणेश चतुर्थी (श्री गणेशाची प्रतिष्ठापना), दिड दिवसाचा गणपतींचे विसर्जन, गौरी आगमन गौरी पूजन, पाच दिवसाचे गणपतींचे विसर्जन, गौरी विसर्जन, सात दिवसांचे गणपतींचे विसर्जन आणि अनंत चतुर्दशी 10 दिवसांचे गणपतींचे विसर्जन आदी सण-उत्सव कार्यक्रम होणार आहेत

 जिल्हयात ग्रामीण, शहरी भागात विविध ठिकाणी यात्रा, जत्रा, ऊरूस लहान मोठया स्वरुपात साजरे होणार आहेत. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच विविध पक्ष, संघटना आणि शेतकरी यांच्या वतीने त्यांचे विविध मागण्यासाठी धरणे, मोर्चे, उपोषण, आत्मदहन, निर्देशने आणि रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  वरील प्रमाणे संपन्न होणारे धार्मिक सण, उत्सव आणि आंदोलनात्मक कार्यक्रम जिल्ह्यात शांततेत पार पाडण्याकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता दि.31 ऑगस्ट 2022 रोजीचे 00.01 पासून ते दि. 14 सप्टेंबर 2022 रोजी 24.00 वाजे पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) प्रमाणे जमाव व शस्त्रबंदी प्रमाणे पुढील बाबी करण्यास मनाई करण्यात येत आहे.

 शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगता येणार नाहीत. लाठया, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील, अशा वस्तू बाळगता येणार नाहीत. कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत. दगड किंवा इतर क्षेत्रपणास्त्रे किंवा फोडवयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळे करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगता येणार नाहीत किंवा तयार करता येणार नाहीत. आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करता येणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान आणि सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी असेल आणि जाहिरपणे प्रक्षोभक भाषण तसेच असभ्य वर्तन करता येणार नाहीत. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक, मोर्चा काढता येणार नाही.असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जारी केले आहेत.


 
Top