उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  तालुक्यातील 32 स्वस्त धान्य दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ( दि. 19) या स्वस्त धान्य दुकानदारांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले - डंबे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार राजाराम केलुरकर, आयएसओ प्रतिनिधी किशोर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा मिळावी, स्वस्त धान्य दुकानात सीएससी सेंटरसह अन्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने राज्य शासनाने स्वस्त धान्य दुकाने आयएसओ मानांकीत करण्याचे निर्देश दिले आहेत. आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी दुकानाचे रेकॉर्ड अद्ययावत असणे आवश्यक आहे. दुकानाचे स्टॉक रजिस्टर अद्ययावत असावे, सीसीटीव्ही,  अग्निक्षमण यंत्र यासह राज्य शासनाच्या 91 निकषांची पुर्तता करणे आवश्यक आहे. या निकषांची पुर्तता केल्यानंतर आयएसओ प्रतिनिधी कडून प्रत्यक्ष दुकानांची पाहणी करून आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात येते.

  उस्मानाबाद तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील जास्तीत जास्त   स्वस्त धान्य दुकाने आयएसओ मानांकन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात सात दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले, तर दुसऱ्या टप्प्यात 25 स्वस्त धान्य दुकानांना आयएसओ मानांकन प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये आळणी, पळसवाडी, समुद्रवाणी, खेड, तेर, कसबे-तडवळे, येडशी, कामेगाव आणि उस्मानाबाद शहरातील स्वस्त धान्य दुकानांचा समावेश आहे. या 32 स्वस्त धान्य दुकानांना ड्रेसकोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. उस्मानाबाद तालुक्यात एकूण  209 स्वस्त धान्य दुकान आहेत.  यापैकी जास्तीत जास्त स्वस्त धान्य दुकाने आयएसओ मानांकित व्हावीत, यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती  तहसीलदार गणेश माळी यांनी दिली. यावेळी उस्मानाबाद तालुक्यातील रेशन दुकानदार उपस्थित होते. 

 
Top