उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या वतीने साजरा केला जाणारा श्री तुळजाभवानी देवीजींचा शारदीय नवरात्र मोहोत्सव हा दि. 17 सप्टेंबर ते दि.11 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये संपन्न होत आहे.   त्यानिमित्ताने अन्न व औषध प्रशासना तर्फे भरारीपथकाची नेमणूक केलेली आहे. दि. 17 ते 28 सप्टेंबर 2022 या कालावधीत तुळजापूर शहरातील एकूण 87 अन्न आस्थापना हॉटेल, स्विट मार्ट, नमकीन, फराळ उत्पादक आणि विक्रेते, खवा आणि पेढा विक्रेते, किरकोळ आणि घाऊक अन्न व्यवसायिक यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. विना परवाना व्यवसाय करणाऱ्या एकूण 29 अन्न व्यवसायिकांना नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत.

 तसेच या कालावधीमध्ये उपवास पीठ, भगर, शाबूदाणा, तेल, गुळ, खजूर, पेढे, रवा लाडू, कुकीज, अशा विविध अन्न पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून ते नमुने अन्न विश्लेषक यांच्याकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार पुढील कार्यवाही घेण्यात येणार आहे.

   मागील दोन-तीन दिवसांमध्ये मराठवाडयात विविध ठिकाणी भगरपीठाचे सेवन केल्यामुळे विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. तरी ग्राहकांनी भगर पीठ चे खरेदी, सेवन करताना घ्यावयाची खबरदारीच्या बाबी खालील प्रमाणे.

   भगर, भगर पीठ आणि इतर अन्न पदार्थ खरेदी करताना परवाना धारक, नोंदणी धारक अन्न व्यवसायिकाकडूनच खरेदी करावे. पॅकबंद भगर, भगर पीठ खरेदी करावे, पॅकबंद पॅकेटवर बॅच नं. उत्पादकाचे नाव आणि पत्ता, उत्पादन दिनांक, “Best before use date / Expiry Date” अशा बाबींची खात्री करूनच खरेदी करावे. भगर, भगर पीठ हे खुल्या बाजारातून, हातगाड्यावरून विकत घेवू नये. बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यानंतर ते स्वच्छ करून त्यानंतर घरगुती पद्धतीने स्वत: घरीच तयार करून सेवन करावे.

  तरी ग्राहकांनी बाजारातून, किराणा दुकानातून तयार भगर पीठ किंवा उपवास पीठ याचे सेवन करू नये. खरेदी केलेल्या भगरीचे पक्के खरेदी बिल घ्यावे. भगरपीठापासून तयार केलेली भाकरी ही परीपूर्ण भाजलेली आहे याची खात्री करूनच सेवन करावे. आवश्यक तेवढीच भगर तयार करून त्याचे सेवन करावे, शिळी भगरीचे सेवन होणार नाही याची दक्षता घ्यावी. सध्याचे पावसाळी वातावरण पाहता भगरीला बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे विषबाधा होण्याचा धोका वाढतो तरी भगर साठविताना हवाबंद डब्यामध्ये साठविण्यात यावी, ती स्वच्छ आणि कोरड्या वातावरणात ठेवावी.भगर बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावी आणि त्याकरिता पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.

   अशा प्रकारे ग्राहकांनी स्वच्छ आणि सुरक्षित अन्न पदार्थ सेवन करण्याच्या दृष्टीने या सर्व सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त  शि. बा. कोडगिरे यांनी केले आहे.


 
Top