उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे ११ विभाग सुरू असून प्रशासकीय इमारत विज्ञान भवन, मुलींचे वस्तीगृह आदी कामावर ३८ कोटी ९८ लाख रुपये खर्च झाला आहे. उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात रूपांतर होण्यासाठी अजून २० कोटी खर्च करावे लागतील, अशी माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

सोमवार दि. २९ ऑगस्ट रोजी निंबाळकर यांनी पत्रकारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उस्मानाबादेतील उपकेंद्र परिसरांची माहिती दिली. ३० ऑगस्ट रोजी विद्यापीठ उपकेंद्राच्या वतीने जीवन साधना पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते शहरातील एम.डी.देशमुख सर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ.शाम शिरसाट, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड, कुलसचिव प्रा.डॉ.जयश्री सूर्यवंशी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमापुर्वी विद्यार्थींनी वसतीगृहाचे उद्घाटन, विद्यार्थी वस्तीगृह व संचालक निवासस्थान, इमारतीचे भूमिपूजन होणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. 

पाच पदे भरल्यास पुर्ण विद्यापीठ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात कुलगुरू, कुलसचिव परिक्षा नियंत्रक आदी पाच पदे भरल्यानंतर उपकेंद्राचे पुर्ण विद्यापीठात रूपांतर होऊ शकते, उपकेंद्रात माती, पाणी परिक्षण यासाठी अत्यांधुनिक लॉब असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे निंबाळकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस डॉ.गायकवाड, डॉ.प्रशांत दिक्षीत, डॉ.नितीन पाटील, प्रा.गणेश शिंदे आदी उपस्थित होते. 

 
Top