उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई येथील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार येथील जिल्हा  न्यायालयात काल घेण्यात  आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत 9 कोटी 72 लाख 64 हजार 704 रुपयांच्या प्रकरणांमध्ये तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच कौटुबिक न्यायालयातील तीन प्रकरणात तडजोड घडवण्यात  यश आल्याने त्यांचे संसार पुन्हा जुळले आहेत. विशेष म्हणजे हे कालच्या लोक अदालतीचे वैशिष्टय म्हणावे लागेल

  संपूर्ण जिल्ह्यामध्ये काल राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. उस्मानाबाद येथील जिल्हा न्यायालयात सकाळी दहा वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या.के. आर. पेठकर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने लोकअदालतीचे  उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली डंबे-आवले,बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा चे सदस्य एम. एस. पाटील, जि. न्या-1 राजेश एस. गुप्ता, जि.न्या-2 के. ए. बागी, जि. न्या-3 व्ही. जे. मोहिते, जि. न्या-4जी.पी. अग्रवाल, तदर्थ जिल्हा न्यायाधीश १पी. एच. कर्वे, , जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर, तसेच जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस. आर. मुंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत एस यादव, सर्व न्यायिक अधिकारी, भूसंपादन अधिकारी, महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, बँक अधिकारी, ग्रामसेवक, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक ए. डी. घुले यांनी केले. या लोकअदालतीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पक्षकारांना आणि उपस्थित सर्वांना सामाजिक अंतर ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

 

 
Top