उस्मानाबाद/प्रतिनिधी-

  स्वातंत्र्यदिनानिमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी तिरंगा ध्वज यात्रेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी 15 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद येथे भारतातील सर्वात मोठ्या तिरंगा ध्वज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या पदयात्रेतील ध्वज 7575 फुट (2309 मीटर) इतक्या लांबीचा होता. या ध्वज यात्रेत संस्थेच्या विविध शाखेतील 10 हजार विद्यार्थ्यी व 1 हजार शिक्षक कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली.

या तिरंगा ध्वज पदयात्रेचा प्रारंभ तुळजापूर विधान सभेचे आमदार  राणाजगजीतसिंह पाटील व जिल्हा न्यायाधीश प्रशांतजी कर्वे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. सुधीर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस सौ प्रेमा सुधीर पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, डॉ. अमोल जोशी सर, गोरख देशमाने, प्रदीप गोरे सर, डॉ. गजानन वाले, डॉ. अजित मसलेकर, डॉ. काझी सर, डॉ. जगताप सर, उल्हास सुरवसे सर, मनोज पसारे सर श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव देशमुख,  पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या तिरंगा ध्वज पदयात्रेत भारतमाता, महापुरुषांच्या वेशभूषा साकारलेले विद्यार्थी, विविध पथके त्यामध्ये एन.सी.सी. पथक, ढोल पथक, पथनाट्य पथक, झेंडा पथक, टाळकरी पथक, विविध क्षेत्रातील गुणवंत खेळाडू अशा विविध पथकांचा समावेश होता. 

या तिरंगा ध्वज यात्रेचा प्रारंभ सकाळी साडे नऊ वाजता श्रीपतराव भोसले हायस्कूल समोरुन झाला. ही ध्वज यात्रा पुढे लेडीज क्लब, संत गाडगे बाबा चौक, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संत बसवेश्वर महाराज चौक (सेंट्रलबिल्डिंग), माणिक चौक, राजमाता जिजाऊ चौकातून शेवटी श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये यात्रेची सांगता झाली.

यावेळी बोलताना सुधीर पाटील यांनी सागितले की, ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी तिरंगा ध्वज पदयात्रा आहे. 2309 मी लांब तिरंगा ध्वज असणाऱ्या ह्या ध्वज यात्रेची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

उस्मानाबाद शहरातून निघालेल्या या भव्य तिरंगा ध्वज पदयात्रेमुळे शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

 
Top