तुळजापूर / प्रतिनिधी-

 सततच्या पावसामुळे सोयाबीन पाण्याखाली गेले असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकरी संकटात सापडला असून शासनाने सरसकट हेक्टरी ७५ हजारांची मदत देण्याची मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे. तसेच विमा मंजूर केल्याची जाहिरातबाजी करणारे आमदार व त्यांच्या पक्षाचे सरकार येताच गप्प का? असा सवालही त्यांनी केला. 

तुळजापूर येथील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील, तालुकाध्यक्ष अमर मगर, मुकुंद डोंगरे, अशोक बचाटे, दिलीप सोमवंशी, शिवाजी गायकवाड उपस्थित होते. सततच्या पावसामुळे खरीप हंगाम हातातून गेला असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.


 
Top