उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दि. 01 जानेवारी 2023  या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम  घोषित केला आहे. या कार्यक्रमाचे टप्‍पे पुढीलप्रमाणे आहेत.

  मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, दुबार-समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दुर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग-भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्रांच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून, मतदान केंद्रांच्या यादीला मान्यता घेणे; आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे दि.04  ते 24 ऑक्टोबर 2022, नमुना 1-8  तयार करणे--  01 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी आणि एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे दि.25 ऑक्टोबर 2022 ते दि.07 नोव्हेंबर 2022, एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे दि. 09 नोव्हेंबर 2022, दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 09 नोव्हेंबर 2022 ते दि. 08 डिसेंबर 2022, विशेष  मोहिमांचा कालावधी दावे आणि हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, दावे व हरकती निकालात काढणे दि. 26 डिसेंबर 2022, अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे तसेच डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई दि. 03 जानेवारी 2023 आणि मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे दि. 05 जानेवारी 2023 या प्रमाणे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम असणार आहे.

  त्यानुसार जिल्ह्यातील दि.01 जानेवारी 2023   या अर्हता दिनांकास पात्र नागरिक या कार्यक्रमानुसार मतदार यादीमध्‍ये नाव नोंदणीसाठी आपल्‍या मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी ( BLO) यांच्याकडे अर्ज करु शकतात किंवा Online पध्‍दतीने NVSP पोर्टलवर, Voter Helpline App व्‍दारे अर्ज करु शकतात. भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी आणि न्याय मंत्रालय यांच्याद्वारा निवडणुक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. तद्नुषंगाने मतदार नोंदणी नियम 1960 मध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार चार अर्हता दिनांक अनुक्रमे 01 जानेवारी, 01 एप्रिल, 01 जुलै आणि 01 ऑक्टोबर उपलब्ध झाल्या आहेत. आता, 01 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारीत वार्षिक पुनरिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल.प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 01 जानेवारी या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आणि त्यापुढील 01 एप्रिल, 01 जुलै आणि 01 ऑक्टोबर या अर्हता दिनांकांवर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करु शकतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे.


 
Top