उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहर पाणी पुरवठ्याच्या 1 कोटी 8 लाख रुपये थकबाकीसाठी उजनी धरणातून होणार्‍या पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्याचा निर्णय महावितरणने ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतला. त्यामुळे शहरावरील जलसंकट टाळण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधून महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना शहर पाणीपुरवठ्याची वीज न तोडण्याची सूचना देण्याची विनंती केली. त्यावर अधीक्षक अभियंता पाटील यांनी वीज पुरवठा खंडित करणार नसल्याचे सांगितल्यामुळे ऐन गणेशोत्सवात शहरावरील जलसंकट टळले असल्याची माहिती जिल्हप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली.

 उस्मानाबाद शहरातील जनतेला मागील आठ वर्षापासून उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. या पाणी पुरवठ्यासाठी उस्मानाबाद नगरपालिकेला दरमहा तब्बल 40 लाखापेक्षा जास्त वीजबिल भरावे लागते. सद्यस्थितीत उस्मानाबाद नगरपालिकेची 1 कोटी 8 लाख रुपये इतकी वीजबिल थकबाकी आहे. या थकबाकी पोटी महावितरण कंपनीने उजनी पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात निर्णय घेतला होता. 

 दरम्यान, आगामी गणेशोत्सव, गौरी-गणपतीचा सण विचारात घेऊन उस्मानाबाद शहरवासीयांना पाणी टंचाई जाणवू नये याकरिता राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्याशी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी थकबाकी संदर्भात चर्चा केली. त्या अनुषंगाने महावितर कंपनीचे अधीक्षक अभियंता पाटील आणि सावंत यांच्यात चर्चा घडवून आणल्यानंतर अधीक्षक अभियंत्यांनी वीज पुरवठा खंडित करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे उजनी धरणातून उस्मानाबाद शहर पाणी पुरवठा योजनेची वीज सुरळीत राहणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले.


 
Top