उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कोविड- 19 आजारापासून सरंक्षण होण्याकरीता मास्क, सॅनिटायझरचा वापर, हात वारंवार स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर पाळणे या बाबींसोबतच कोविड-19 प्रतिबंधक लस हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. ही लस घेतल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून संरक्षण मिळतेच पण यदाकदाचित संसर्ग झालाच तरी कोविड- 19 आजाराची तीव्रता अत्यंत कमी राहते. त्यामुळे न्युमोनिया किंवा मृत्यू टाळता येतो.
राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमांतर्गत नॅशनल टेक्नीकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI ) यांनी केंद्र शासनास केलेल्या शिफारसीनुसार केंद्र शासनाने दि.22 ऑगस्ट 2022 पासून ज्या भारतीय किंवा परदेशी नागरीकांनी परदेशात कोविड लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. परंतु दुसरा अथवा प्रिकॉशन डोस राहिला आहे अशा नागरीकांना भारतात उपलब्ध असलेल्या कोविड लसींपैकी कोणतीही एक लस घेण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच कोविड लसीकरणाची नोंद कोविन अॅपमध्ये करण्यासाठी आवश्यक योग्य ते बदल कोविन ॲपमध्ये करण्यात आलेले आहेत. तरी ज्या भारतीय किंवा परदेशी नागरीकांनी परदेशात कोविड लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे, परंतु दुसरा अथवा प्रिकॉशन डोस राहिला आहे, त्यांनी नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.