उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात कार कोसळून झालेल्या अपघातात मायलेकीचा दुर्दैवी अंत झाला, तर अन्य एक मुलगी व चालक पिता बचावला आहे. तुळजापूर तालुक्यातील कसई शिवारात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तुळजापूर आणि उस्मानाबाद येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन मृतदेह बाहेर काढले असून वेळीच घटनेची माहिती मिळाली असतील तर दोघींचे प्राण वाचवता आले असते, अशी प्रतिक्रिया अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली.

प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील कसई येथील सचिन पांडुरंग बनसोडे (वय 33) हे स्वीफ्ट डिझायर कारमधून पत्नी अंकिता व मुली तृप्ती व तनुजा यांच्यासह गुलबर्ग्याहून कसई गावाकडे परत जात होते. कसई शिवारात रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्डयात साचलेल्या पाण्यात कार कोसळल्यामुळे चौघेही कारमध्ये अडकले. यातील सचिन बनसोडे व तनुजा ही मुलगी बचावले. दुर्दैवाने अंकिता (वय26) व मुलगी तृप्ती (वय7) यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच  तुळजापूर पोलीसांचे पथक तसेच तुळजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याचवेळी उस्मानाबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्याशी संपर्क साधून तेथील अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले. दोन्ही ठिकाणच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन मृतदेह बाहेर काढले.  या दुर्घटनेने कसई गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

 
Top