उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तिकिटासाठी प्रवाशाने दिलेले १० रुपयांचे नाणे नाकारून प्रवाशाला वाईट वागणूक दिल्याप्रकरणी उस्मानबााद ग्राहक आयोगाने बार्शी डेपोच्या एसटी कंडक्टरला ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या निकालामुळे दहा रुपयांचे नाणे नाकारणाऱ्या व्यापाऱ्यांनाही धडा मिळाला आहे.

उस्मानाबादचे अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद २२ मे २०१९ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बार्शी डेपोच्या गाडीने वैराग ते उस्मानाबाद येण्यासाठी एसटीतून (एमएच२०डी ८१६९) प्रवास करीत होते. बसचे कंडक्टर  बी.वाय.काकडे यांनी प्रवाशी अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांना तिकीट काढण्यासाठी रकमेची मागणी केली.त्यावेळी अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांनी अपंगत्वाचे ओळखपत्र दाखवून १० रूपयाचे एक नाणे व ५ रूपयाचे एक नाणे कंडक्टर यांना दिले.यावेळी कंडक्टर काकडे यांनी १० रूपयाचे नाणे चालत नाही असे सांगितले. कंडक्टर यांनी १० रूपये नाणे नाकारले.त्याबद्दल अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांनी उस्मानाबाद ग्राहक आयोगाकडे कंडक्टर काकडे व बार्शी डेपोविरूध्द तक्रार दाखल केली. अर्जदारातर्फे अॅड.महेंद्र एम. सोनवणे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून ग्राहक आयोगाने आदेश पारित करत कंडक्टरविरूध्द निकाल दिला. त्यात अर्जदारांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी ८ हजार रूपये देण्याचे आदेश केले.

 
Top