उमरगा / प्रतिनिधी-

 अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जाळून खून केल्याप्रकरणी आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.गुरूवारी या खटल्याचा निकाल देण्यात आला.

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील शिवबाई राजू बंडगर पतीच्या निधनानंतर आपल्या दोन मुली व एका मुलासोबत वास्तव्यास राहत होत्या. २०११ ला पतीच्या निधनानंतर अाणि घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी गावाशेजारील सय्यद हिप्परगा येथील वैजिनाथ किसन ओवांडे यांच्यासोबत अनैतिक संबंध जुळले होते. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री वैजिनाथ ओवांडे हा शिवबाई बंडगर हिच्या घरी येवून तक्रार करू लागला. तेव्हा शिवबाईने तक्रार करू नको, असे म्हटल्याने सकाळी उठल्यानंतर वैजिनाथ याने घरात डब्यातील रॉकेल शिवबाईच्या अंगावर टाकले व शिवबाईला मारहाण करून पेटवून दिले. यातच शिवाबाईचा मृत्यू झाला.शिवबाईने मृत्यपूर्व दिलेल्या जबाबावरुन लोहारा पोलिस ठाण्यात वैजिनाथ किसन ओवांडे (३५) याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणी शासनातर्फे ११ जणांची साक्ष झाली. पुरावा व शासकीय अभियोक्ता ॲड.संदिप देशपांडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून वैजिनाथ ओवांडे यास जन्मठेप व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.


 
Top