उमरगा / प्रतिनिधी-
खुनाच्या घटनेची केलेली केस काढून घेण्याच्या कारणावरून एका रिक्षाचालकास केलेल्या मारहाणीत त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. ही घटना सोमवारी (दि. २५) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
उमरगा येथे कोळीवाड्यातील कुमार दिगंबर आबाचने (१९) सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उमरगा येथून रिक्षाभाडे घेवून बेडगा येथे गेला होता. कुमार याला विकास किसन जाधव (रा. तुरोरी), व्यंकट इराप्पा धोत्रे, आकाश इराप्पा धोत्रे, प्रशांत अशोक पुरातले, ओमकार बंडगर, रोहित चुंगे (रा. काळे प्लॉट, उमरगा) यांनी मारहाण केली. त्याची रिक्षा उमरगा ते डिग्गी रोडवरील चिंचोली गावाच्या पुढे पुलाजवळ रोडखाली उलटून टाकली. कुमारचे वडील दिगंबर आबाचने यांना हे समजताच ते घटनास्थळी गेले. त्यांना कुमार रिक्षापासून थोड्या अंतरावर जखमी अवस्थेत आढळला. कुमारला उमरगा येथे उपचारासाठी नेताना कुमारने मारहाण केलेल्यांची नावे सांगितली. तसेच मागील त्याच्याच चुलत बंधूच्या खुनाप्रकरणी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी मारहाण केल्याचे सांगितले. दरम्यान, कुमार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुमारचे वडील दिंगबर आबाचने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहा जणांविरोधात उमरगा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास मनोजकुमार राठोड करीत आहेत. मंगळवारी अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड, सहायक पोलिस निरीक्षक समाधान कवडे आदी उपस्थित होते. कुमार याच्या चुलत बंधूंचा गतवर्षी खून झाला होता. यातील आरोपीही कुमार यांना मारहाण करणाऱ्यात आहेत.