उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील कवयित्री भाग्यश्री केसकर लिखित ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ या कवितासंग्रहाला मानाचा राज्यस्तरीय मेघदूत साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. रविवार, 10 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र दास यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी दिली आहे.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात अधिपरीचारिका पदावर कार्यरत असलेल्या भाग्यश्री रवींद्र केसकर यांचा ‘उन्हानं बांधलं सावलीचं घर’ हा कवितासंग्रह जानेवारी 2020 मध्ये प्रकाशित झाला आहे. मुंबई येथील ग्रंथाली प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाने यापूर्वी बडोदा येथील अखिल भारतीय पातळीवरील अभिरुची साहित्य गौरव पुरस्कारासह अन्य सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

मागील दोन वर्षे कोविडमुळे सार्वजनिक कार्यक्रम न झाल्याने यावर्षी सन 2020 व 2021 अशा दोन वर्षातील प्रत्येकी एक, असे दोन उत्कृष्ट काव्यसंग्रह निवडण्यात आले. उस्मानाबाद येथील कवयित्री भाग्यश्री केसकर यांच्या उन्हानं बांधलं सावलीचं  घर (सन 2020) तर करमाळा येथील कवी प्रकाश लावंड यांच्या काडवान (सन 2021)  या काव्यसंग्रहांची मेघदूत पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ज्येष्ठ साहित्यिक  डॉ. राजेंद्र दास यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्रीशिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली मातृ मंदिर, ढगे मळा बार्शी येथे सायंकाळी 5.30  वाजता होणार्‍या 30 व्या कवी कालिदास महोत्सवात मेघदूत पुरस्काराचे वितरण होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक पं. ना. कुलकर्णी व कवी प्रकाश गव्हाणे हे सदर पुरस्कारांचे प्रायोजक आहेत.

भाग्यश्री केसकर यांच्या कवितासंग्रहाला यापूर्वी उमरगा येथील महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार, लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, मंगळवेढा येथील शब्दकळा राज्यस्तरीय पुरस्कार, कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टचा उल्लेखनीय ग्रंथ सन्मान आणि पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथील मसापचा पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्काराबद्दल मिळालेला आहे. मानाच्या मेघदूत राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराबद्दल भाग्यश्री केसकर यांचे अभिनंदन केले जात आहे.


 
Top