उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 माहेरहून दहा तोळे सोने आणण्यासाठी तगादा लावून सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केला. यास कंटाळून विवाहित महिलेने गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (०२) उमरगा शहरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजाबाई रंगराव सोळुंके यांची मुलगी दीपालीचा विवाह अभिनंदन शिवाजी पाटील (रा. लाडवंती, बसवकल्याण) यांच्यासोबत १९ एप्रील २०१८ रोजी झाला. दिपाली, पती, सासरा व सासू शहरातील शिवपुरी भागात रहात होते. लग्नात ठरल्याप्रमाणे दोन लाख रुपये हुंडा अन् पाच तोळे सोने दिले होते. मात्र, दीपालीस सासरच्यांनी लग्न झाल्यानंतर एक वर्ष चांगले नांदवले. त्यानंतर तिचा छळ सुरू केला. दीपालीची मोठी नणंद बाळंतपणाला आल्यानंतर ती दिपालीला भांडत असे. सासु, सासरा व पतीही तू आम्हाला पसंत नव्हती. तरीही लग्न करुन आम्ही तुझ्यावर उपकार केले. तू आमची मोलकरीण आहेस, असे म्हणुन तिला सतत त्रास देत असत. त्यात दीपाली गर्भवती राहिल्यानंतर तिचा सासरा, सासू व नवरा डोहाळे जेवणाचा कार्यक्रमात दहा तोळे सोने घाला मगच तिला घेऊन जा म्हणून दीपाली सोबत भांडण करत. बाळंतपणानंतर माहेरच्या मंडळींनी उसनवारी करून पाच तोळ्याचे सोन्याचे कडं दिल्यानंतर दिपालीला जाऊ दिले. सहा महिन्यानंतर परत राहिलेल्या पाच तोळे सोन्यासाठी दीपालीचा छळ सुरू होता. या छळाला कंटाळून शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास दीपालीने शिवपुरी येथील घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तेजाबाई रंगराव सोळुंके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती अभिनंदन शिवाजी पाटील, सासरा शिवाजी व्यंकट पाटील, सासू शशिकला शिवाजी पाटील, मोठी नणंद पुष्पा व नणंद यांच्या विरुद्ध उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.


 
Top