उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील प्रमिलानगर ते विजयनगर या मार्गावर खड्डयांचे साम्राज्य आहे. आधीच खड्डे आणि त्यात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे या या भागातील नागरिकांना येता-जाता मोठी कसरत करावी लागत असल्याने या भागातील रहिवाशी तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष अमोल पेठे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने मुरूम टाकून खड्डे बुजविले आहेत. त्यामुळे नागरिकांचा पावसाळ्यात होणारा त्रास कमी झाला आहे.

 प्रभाग क्रमांक तीनमधील प्रमिलानगर, विजयनगर या भागात नागरिकांची मोठी वस्ती आहे. याच भागात गॅसपंप असल्यामुळे शहरासह इतर भागातील नागरिक येथे येतात.  परंतु प्रमिलानगर ते विजयनगर भागातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्किल झालेले आहे. दुचाकी-चारचाकी वाहन चालविताना तर मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात या खड्डयांमध्ये पाणी साचत असल्याने नागरिकांना खड्डयाचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने आदळण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन येथील रहिवाशी तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष अमोल पेठे यांनी ही अडचण दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. या रस्त्यावरील खड्डयांमध्ये स्वखर्चाने मुरूम टाकून खड्डे बुजवून नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याचा प्रयत्न पेठे यांनी केला आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशानी पेठे यांचे आभार व्यक्त केले. नागरी समस्यांमुळे रहिवाशांना होणारा त्रास दूर करण्यासाठी यापुढेही आपण कायम प्रयत्न करणार असल्याचे पेठे यांनी सांगितले.


 
Top