उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  शिंदे-फडणवीस सरकारने धाराशिव हे नामकरण करत जिल्ह्याच्या शाश्वत व दैदीप्यमान विकास पर्वाचे वचन दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्य व केंद्र सरकारची पूर्ण ताकद लावून जिल्ह्यातील प्रलंबित अतिमहत्वाच्या विषयांना गती देण्याचा शब्द दिला आहे. येत्या काळात धाराशिव वासियांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल असे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

 जिल्हावासियांची अनेक वर्षांची मागणी कायद्याच्या चौकटीत बसेल अशी प्रक्रिया करून,पूर्ण करण्यात येत आहे. आजच्या मंत्री मंडळाच्या निर्णयानंतर शहराच्या नामकरणासाठी अंतिम मान्यता ही केंद्र सरकारकडून घेतली जाणार आहे. तालुका व जिल्ह्याचे नामकरण हा राज्य सरकारच्या महसूल विभागाचा विषय आहे. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात नामकरणाचा ठराव मंजूर करून ही प्रक्रिया पूर्णत्वा पर्यंत नेण्यात येईल.

 केवळ नामकरण करून न थांबता जिल्ह्याची नवीन ओळख ही दैदिप्यमान, शाश्वत व सर्वांगीण विकासाने करण्याचे भारतीय जनता पार्टीचे ध्येय असून त्यासाठी केंद्र व राज्य सरकारची पूर्ण मदत मिळेल हा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. हजारो रोजगारांची निर्मिती करणारा टेक्निकल टेक्स्टाईल प्रकल्प, पिण्यासाठी व शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करणारा वॉटरग्रीड प्रकल्प, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग, तुळजापूर विकासाचा प्रशाद प्रकल्प यासह विविध अतिमहत्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न होणार आहेत. मंत्रीमंडळ गठन व खातेवाटप होताच या विषयांना मोठी चालना मिळणार आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य लागणार आहे व या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने आपल्या स्वप्नातले धाराशिव साकारण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने सहभाग द्यावा, साथ द्यावी, प्रयास करावा असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी केले आहे.


 
Top