उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मुरुम व लोहारा येथे स्थानिक गुन्हे शाखेने जुगार खेळणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी जुगाराच्या साहित्यांसह १२ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीस होते. दरम्यान, पथकाचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, मुरुम गावातील ग्रामस्थ दिलीप शेळके यांच्या शेतात एका पत्राच्या शेडमध्ये काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. यावर पथकाने शुक्रवारी ३.३० वाजता छापा टाकला. तेव्हा असता तेथे दिलीप शेळके, विश्वनाथ जगदाळे, प्रकाश मांडवे, लतीफ सरनोबत, सुधाकर नारायणकर, सुरेश राठोड, संजय घुमरे, गोविंद दंडगुले, नितेश देशपांडे, बसवराज ओमशेट्टे, मोहन चव्हाण, व्यंकट घुरघुरे तिरट नावाचा जुगार खेळताना मिळुन आले. त्यांच्याकडे जुगाराबाबत विचारणा केली असता दिलीप शेळके हेच जुगाराचा अड्डा चालवित असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह सात दुचाकी, एक कार, १० मोबाइल व २९ हजार रोख, असा एकुण ११ लाख ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. खनाळ यांच्यासह मनोज निलंगेकर, हवालदार जावेद काझी, हुसेन सय्य्द, सुभाष चौरे, मेहबुब अरब, शौकत पठाण, अमोल चव्हाण, अजित कवडे, नितीन जाधवर, भालचंद्र काकडे, रवींद्र आरसेवाड, बलदेव ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

लोहारा शहरात पोलिसांच्या दोन कारवाया

लोहारा येथील नगरपरिषद गाळ्यात, व रिजाज खडीवाले यांच्या शेडमध्ये ऑनलाइन जुगार सुरू होता. प्रथम नगरपरिषद गाळ्यात छापा टाकला. तेथे आदम मुल्ला, असलम फुलारी व आकाश स्वामी यांना चक्री गेम खेळताना पकडले. एक लाख ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रिजाज खडीवाले यांच्या शेडमध्ये सलमान सय्यद व इस्माइल शेख ऑनलाइन चक्री गेम खेळवताना आढळले. त्यांच्याकडून ५२ हजारांचा माल जप्त केला.


 
Top