उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यानुसार आता पर्यंत मोठ्या प्रमाणात गांजा विक्री करणारे आणि आढळणाऱ्यांवरही कारवाई केली. नुकतीच पोलिसांनी थेट शेतात गांजा ची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुसक्या आवळण्याची कारवाई केली.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेला लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) गावातील गट क्र. ३६७ मधील शेतात शेत मालक- शिवशंकर चंद्रकांत साखरे, वय २८ वर्षे यांनी गांजा या अंमली वनस्पतीची अवैध लागवड केल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उमरगा विभागाचे पोलिस उपअधीक्षक बरकते यांना कळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मनोज निलंगेकर, पोहेकॉ- औताडे, अमोल निंबाळकर, धनंजय कवडे, पोना- काकडे यांसह तहसील कार्यालय, लोहारा येथील नायब तहसीलदार- महादेव जाधव व दोन पंच यांच्या उपस्थितीत बुधवारी २९ जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शेतात पथकाने छापा टाकला. यावेळी उसात गांजाचे १४ झाडे एका ओळीत लावलेली व त्यास पोन, बोंडे असलेली आढळली.

ही गांजाचे झाडे पथकाने मुळासकट उपटून जप्त केली. त्यांचे वजन १८.२७ कि.ग्रॅ. इतके आढळले. यावरुन शिवशंकर साखरे यांच्याविरुध्द लोहारा पोलिस ठाण्यात नार्कोटिक्स ड्रग्ज ॲन्ड सायकोट्रॉपीक सबस्टन्स ॲक्ट कलम- २० नुसार गुन्हा नोंदवला. पुढील तपास लोहारा पोलिस ठाण्याचे ररवडे हे करत आहेत. पोलिसांनी कारवाई सुरू ठेवल्याने अशा प्रकारचा गुन्हा दाखल होऊ शकला आहे.


 
Top