उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीचे  आज उस्मानाबाद शहरात आगमन झाले. शहराच्या सीमेवर पालखी दाखल होताच नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनी प्रथेनुसार स्वागत करुन पूजन केले.

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गजानन महाराज पालखीचा सोहळा दरवर्षी उस्मानाबाद शहरातून पंढरपूरकडे जातो. पालखीचे शहरात आगमन होणार असल्याने नगर पालिका प्रशासनामार्फत देखील जय्यत तयारी करण्यात आली होती. पालखीमार्गाची भल्या पहाटेच स्वच्छता करुन निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी मार्गाच्या स्वच्छतेसाठी पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा ताफा पहाटेच कामाला लागला होता. पालखीचे आगमन झाल्यानंतर परंपरेनुसार नगर पालिकेच्या वतीने स्वागत करण्यात येते. त्यानुसार सकाळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनी पालखीचे स्वागत केले. मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांच्या हस्ते पालखीची आरती व पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी शहरात दाखल झाली. जागोजागी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.


 
Top