उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हयातील मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्हयातील मुलींचे दरहजारी प्रमाण वाढविण्यासाठी आणि जिल्हयात गर्भधारणा पूर्व आणि जन्मपूर्व निदान प्रतिबंध कायदा 1994 काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, यांच्या अध्यक्षतेखाली दि. 21 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत  मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,  अपर जिल्हाधिकारी, रुपाली आवले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धनंजय पाटील,  जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. एन. डी. बोडके आणि सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्हयात मागील काही वर्षापासून मुलींचे प्रमाण कमी होत असल्याबाबत  श्री.दिवेगावकर यांनी चिंता व्यक्त केली.

 जिल्हाधिकारी यांनी यावेळी जिल्हयातील सर्व दवाखन्यांना भेटी देवून अनाधिकृतपणे लिंगपरिक्षण करणा-या वैद्यकीय  व्यवसायीकांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सीमावर्ती भागात बाहेरून वाहनांदवारे लोक येऊन अनाधिकृतपणे गर्भपात करतात, पोलीस विभागांनी यांवर लक्ष ठेवून कार्यवाही करावी. ज्या औषधी दुकानांमध्ये अनाधिकृतपणे गर्भपाताची औषधी विकली जातात तेथे धाडी टाकण्यात याव्यात व संबंधित दुकानदारांवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्याबाबत श्री. दिवेगाकर यांनी सुचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आणि  पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी  यांनी उपस्थित उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना जिल्हयातील घटते मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी संयक्तपणे कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले.

लोकांची मुलींबाबतची मानसिकता सुधारण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रीतपणे प्रयत्न करण्याचे तसेच जिल्हयात होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व पोलीस विभागांनी कार्यवाही करावी अशा सुचना असे निर्देश श्री.दिवेगावकर यांनी दिले.


 
Top