उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 बस चालकासोबत वाद घालून शासकीय कामात अडथळा केल्याच्या आरोपातून सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी अतुल कल्याण बोंदर व राहुल मधुकर बुधवंत यांनी 5 जुलै 2012 रोजी राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या बससमोर आपली टाटा सुमो गाडी लावून चालकाशी वाद घालत त्यास शिवीगाळ व मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती दोन्ही आरोपीविरुध्द उस्मानाबाद येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 3 साक्षीदार तपासण्यात आले. परंतु न्यायालयासमोर चौकशी दरम्यान आलेला पुरावा, तपासातील विसंगती इत्यादी बाबींवर उस्मानाबाद येथील विधिज्ञ ऍड. विष्णु शिवाजी बोंदर यांनी सत्र न्यायालयासमोर आरोपीतर्फे युक्तीवाद सादर केला. सदोष पुरावे आणि युक्तीवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश कर्वे यांनी आरोपी अतुल कल्याण बोंदर व राहुल मधुकर बुधवंत यांना निर्दोष मुक्त केले आहे. 


 
Top