उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मंगरूळ बीट मधील शिक्षक नेहमीच आपली सामाजिक दायित्वाची भावना जपत आले आहेत . शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक विकासासाठी लोकसहभागाची चळवळ हा तर मंगरूळ बीट चा आत्मा राहिला आहे. हे करत असतानाच मंगरूळ बीट मधील शिक्षकांनी आतापर्यंत अनेक गरजू व्यक्तींना प्रसंगी लाखो रुपयांची मदत केलेली आहे. कोरोना कालावधीत लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बीट मधील निव्वळ गरजू लोकांना शिक्षकांनी घरोघरी जाऊन अन्नधान्याचे व किराणा सामानांचे किट वाटप केले आहेत. तसेच बीट मधील व बीट बाहेरील अकाली निधन पावलेल्या पेन्शन लागू नसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना वेळोवेळी भरघोस आर्थिक मदत केलेली आहे. तसेच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत ही केलेली आहे. मंगरूळ बीटची हीच परंपरा कायम ठेवत बीट मधील दोन्ही किडन्या क्षतिग्रस्त झालेल्या व घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असणाऱ्या लक्ष्मण लोहार या शिक्षकाला बीट मधील शिक्षकांच्या पुढाकाराने रुपये एक लाख पन्नास हजार अडुसस्ट (1,50,068/-)एवढा निधी जमा करून त्याचा एकत्रित धनादेश काल शिक्षण परिषदेमध्ये विस्तार अधिकारी मल्हारी माने यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.

         हा निधी जमा करण्यासाठी बीट मधील केंद्रप्रमुख विठ्ठल गायकवाड, केंद्रप्रमुख संजय वाले याचबरोबर श्री प्रमोद डोंगरे, शिवाजी साखरे, नागनाथ वडणे, सुसेन सुरवसे, बापूराव मोरे या बीट मधील शिक्षकांनी तसेच तीर्थ खुर्द केंद्रातील शिक्षकांनी पुढाकार घेतला. यामध्ये बीट मधील व बीट बाहेरील एकूण 127 शिक्षकांनी आपले योगदान दिले. त्याबद्दल मंगरूळ बीटचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 
Top