उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जे पक्षातून गेले, गद्दारी केली, त्यांना जाऊ द्या. आपण पुन्हा एकदा खंबीरपणे उभे राहू आणि भरारी घेऊ. मूळ शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, अशी साद घालत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना बळ देण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांची बैठक मंुबईतील शिवसेना भवनात पार पडली, यावेळी ठाकरे यांनी बंडखोरांना साथ न दिल्याबद्दल आ. कैलास पाटील व खासदार ओमराजे यांचे कौतुक केले.

जिल्ह्यातील शिवसेनेचे डॉ. तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले हे दोन आमदार शिंदे गटासोबत गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दुसरीकडे आमदार कैलास पाटील यांनी गुजरात सीमेपासून मुंबई गाठली, त्यांनी आपली सुटका कशीबशी करून घेतली. त्यामुळे पक्षप्रमुख ठाकरे यांनी त्यांचे अनेकदा कौतुक केले आहे. निष्ठावान माणसे आपल्या ध्येयापासून हलत नसतात, त्यामुळे शिवसैनिकांनी कैलास पाटील यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही त्यांनी शुक्रवारच्या बैठकीत केले. याप्रसंगी अामदार पाटील यांनी जिल्ह्यात सेनेच्या माध्यमातून केलेली कामे आणि भविष्यातील नियोजन, याबद्दल माहिती दिली. यावेळी खासदार ओमराजे, अरविंद सावंत, दिवाकर रावते, सचिव अनिल देसाई, विश्वनाथ नेरुळकर, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, शंकरराव बोरकर, बाबा पाटील, मकरंद राजेनिंबाळकर,भारत इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष शामलताई वडणे, उपजिल्हा प्रमुख विजय सस्ते, सतीश सोमाणी, शिवाजी कापसे, कमलाकर चव्हाण, मेजर जाधव, संजय खडके, किरण गायकवाड, मोहन पनुरे, बालाजी जाधवर, सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, बाळासाहेब काकडे आदी उपस्थित होते.

 
Top