उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अटल भूजल योजनेअंतर्गत पुणे येथील आयुक्तालय भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष यांच्या प्रतिनिधी कनिष्ठ भूवैज्ञानिक सुधीर जैन आणि डॉ. नंदकिशोर कचाटे यांनी योजनेतील मौजे. धुत्ता या उस्मानाबाद तालुक्यातील गावाला नुक्तीच भेट दिली. त्यावेळीधुत्ता गावातील प्राथमिक शाळेची अटल भूजल योजनेच्या धडयाने सुरुवात करण्यात आली. या भेटी दरम्यान गावातील जलसुरक्षा आराखडा मधील समाविष्ठ बाबींबाबत उपस्थित ग्रामस्थांसोबत चर्चा केली. यात मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) व पुरवठा आधारित (जलसंधारणाच्या उपाययोजना) याबाबत आराखडयात समायोजित घटकांवर भूजल पूनर्भरण, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाणी पाऊस संकलन, विहीर पूनर्भरण, गाळ काढणे, खोलीकरण, रिचार्ज शॉफट, ड्रिप-स्पिंकलर यांचा अधिकाधिक वापर करण्यावर सविस्तर चर्चा केली आणि मान्सूनपूर्व तसेच मान्सुनोत्तर भूजल पातळी मोजण्याकरीता विंधन विहिरीवरील पाणी पातळीची खोली मोजून जलसुरक्षकाच्या मदतीने यांची नोंद ठेवण्यात आली.

  या दौ-यादरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुत्ता या ठिकाणी कै. रामचंद्र बळीराम शिंदे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वहया आणि पुस्तके तसेच शालेय साहित्याच्या वाटप करण्यात आले. यावेळी जलसुरक्षा आराखडा आणि भूजलाची सद्यस्थिती यावर वरिष्ठ भूवैज्ञानिक एस.बी.गायकवाड यांनी पाण्याचा पूर्ण वापर करावा, पाण्याची गुणवत्ता टिकविणे आणि वाढविणे याकरीता सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

  यावेळी केंद्रप्रमुख बापु रामचंद्र शिंदे प्रमुख पाहुणे निलावती रामचंद्र शिंदे आणि उपसरपंच बालाजी गोरे तसेच आयोजक बाबासाहेब अंकुशे व महादेवी सावळकर यांच्यासह कनिष्ठ भूवैज्ञानिक आर.बी.शेटे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील तज्ज्ञ आणि जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्था येथील दिनकर चाटे आणि कार्यालयातील तसेच गावातील इतर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

 
Top