DCC बँकेने५ दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र  आंदोलन करणार -आम आदमी पार्टीचे ईशारा


उस्मानाबाद/ प्रतिनिधी -
कर्ज वसुली न्यायाधिकरणाने (डीआरटी कोर्ट) ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासंदर्भातील जिल्हा बँकेने राबवलेली निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. त्यामुळे आता विलंब न करता तेरणा साखर कारखान्याचा ताबा तात्काळ भैरवनाथ शुगरला देण्यात यावा, येत्या 5 दिवसामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने तातडीची बैठक घेऊन तेरणा कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगर यांना देऊन तात्काळ कारखाना सुरू करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अजित खोत यांनी दिला आहे.

आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने आज 20 जून रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 9 ते 10 वर्षापासून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासदांनी केलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने निविदा प्रक्रिया राबवून भैरवनाथ शुगर यांना भाडेतत्वावर देण्याचा ठराव पारीत केला. या प्रक्रियेला ट्वेन्टीवन शुगर लातूर यांनी न्यायालयात आव्हान दिल्यामुळे मागील सात ते आठ महिन्यामध्ये 36 हजार शेतकरी सभासदांच्या ऊसाचा प्रश्न गंभीर झाला व कर्मचार्‍याच्या हाताला मिळणार्‍या रोजगाराची आशाही संपुष्टात आली. कारखान्याच्या मशिनरीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. कारखाना सुरू झाला असता तर कारखान्याचे उत्पन्न सुरू होऊन बँकेचा कारखान्यावरील बोजा कमी झाला असता. परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा संपूर्ण तोटा परिसरातील ऊस उत्पादक सभासदांना सोसावा लागला. दि. 17/06/2022 रोजी डीआरटी कोर्ट औरंगाबाद यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेने राबवलेली निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा निर्णय दिल्यामुळे भैरवनाथ शुगर यांना कारखाना सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला. मागील काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अकार्यक्षम कारभारामुळे नऊ वर्ष तेरणा कारखाना बंद अवस्थेत होता. पुढील काळामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रलंबीत न ठेवण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा मध्यवर्ती बँकेने तातडीची बैठक लावून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगर यांना देणे गरजेचे आहे. येत्या पाच दिवसामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने तातडीची बैठक घेऊन तेरणा कारखान्याचा ताबा भैरवनाथ शुगर यांना द्यावा व तात्काळ कारखाना सुरू करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा आम आदमी पार्टी तीव्र आंदोन छेडेल असा इशाराही जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अजित खोत यांनी दिला आहे.

निवेदनावर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अजित खोत, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत भुतेकर, संजय दणाणे, जिल्हा कोषाध्यक्ष विकास वाघमारे, युवक उपाध्यक्ष मोहसीन मिर्झा, मीडिया विभागप्रमुख प्रा.चाँदपाशा शेख, शहराध्यक्ष बिलाल रजवी, शहर सचिव नामदेव वाघमारे, शहाजी पवार, अंकुश चौघुले, नितीन अलकुंटे, राजपाल देशमख, महेबुब शेख यांची स्वाक्षरी आहे. 

 
Top