तेर  / प्रतिनिधी-

राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या तेर ता. उस्मानाबाद येथील अवघ्या कांहीं महिन्यांवर येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  ६ जून रोजी झालेल्या आरक्षण सोडतीमधील काही प्रभागातील आरक्षण सोडतीवर घेण्यात आलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने  २० रोजी नव्याने आरक्षण सोडतीसाठी दुसऱ्यांदा विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सरपंच पद आरक्षित असलेल्या अनु.जमातीच्या महिलेसाठी जागा आरक्षित नसल्याने पारधी समाजातील नागरिक आक्रमक होत काही काळ रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान ग्रामसभेचे प्राधिकृत आधिकारी उद्यसिंह चौरे यांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालीत ग्रामस्थांशी अरेरावीची भाषा वापरल्याने पारधी समाजासह ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाल्याने ग्रामपंचायत परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांनी जलद कृती दलाच्या जवानांना पाचारण केल्यानंतर पोलिस बंदोबस्तात आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांना विश्वासात न घेता काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच लोकशाहीचा गळा घोटल्याची भावना संतप्त नागरिकातून होत आहे.

तेर ग्रामपंचायतच्या 17 जागासाठी 6 जून रोजी  महसूल मंडळ आधिकारी अनील तिर्थकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग आरक्षण  सोडत निघाली  होती परंतु त्यामधील काही प्रभागांतील आरक्षण सोडतीवर  रवीराज  चौगुले यांनी घेतलेला आक्षेप जिल्हाधिकारी यांनी मंजूर केल्याने  २० जून रोजी आक्षेप घेतलेल्या जागेवरील नव्याने आरक्षण सोडतीसाठी दुसऱ्यांदा विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पंचायत समितीचे विस्तार आधिकारी उद्यसिंह चौरे यांना प्राधिकृत आधिकारी म्हणून प्राधिकृत केले होते .कांही जागेचे आरक्षण ६ जून रोजी झालेल्या ग्रामसभेत निघाले परंतु सरपंच पद अनु.जमातीच्या महिलेसाठी राखीव असताना दोन्ही वेळा आरक्षण सोडतीसाठी झालेल्या ग्रामसभेत या प्रवर्गासाठी जागा निघाली नसल्यामुळे पारधी समाज चांगलाच आक्रमक झाला होता .विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक तीन मध्ये हा समाज मोठ्या प्रमाणावर असतानाही सोमवारी झालेल्या आरक्षण सोडतीत अनु.जमातीची जागा प्रभाग क्रमांक चार मध्ये  देण्यात आली.

ज्याठिकाणी हा समाज बहुसंख्य आहे त्याठिकाणीच अनु.जमातीची जागा द्या अशी मागणी ग्रामसभेत बहुसंख्य ग्रामस्थांनी केली. परंतु प्राधिकृत आधिकारी चौरे यांची  ग्रामसभेचे ऐकूण न घेता  मी मांडतो तेच खरे अशी आडमुठी भुमिका घेतल्यामुळे समाज आक्रमक झाला .त्यामुळे  संतप्त जमावाने काही काळ उस्मानाबाद- लातूर या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको केल्याने वहानाच्या रांगा लागल्या होत्या.

शेवटी पोलिस बंदोबस्तात  प्राधिकृत अधिकारी उदयसिंह चौरे , ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी , मंडळ अधिकारी अनिल तीर्थंकर , तलाठी प्रशांत देशमुख , ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत , पोलिस पाटील फातिमा मणियार यांच्यासह  जलद कृती दलाच्या जवानांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. दरम्यान नागरिकांना विश्वासात न घेता पोलिस बंदोबस्तात करण्यात आलेली आरक्षणाची सोडत अन्यायकारक असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्याने” कुठे नेहून ठेवलाय गाव माझा” अशी भावना नागरिकांतून होत होती. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत जलद कृती दलाचे जवान गावत तैनात असल्याने ग्रामपंचायतसह परिसरात पोलिस छावणीचे स्वरूप निर्माण झाले होते. 

 
Top