उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वाशी तालुक्यातील इंदापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर अचानक जॅक फेकून अपघात घडवून कारमधील महिलांना मारहाण करत ७५ ग्रॅम दागिने लंपास करणाऱ्यास पोलिसांनी २३ जून रोजी ताब्यात घेतले आहे. उर्वरित साथीदारांच्या शोधात पाेलिस असून गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करत आहेत.

तेलंगणातील कुल्काचेर्ला (जि. विकाराबाद) येथील नवीन रामलु केतावत हे स्विफ्ट डिझायर कारने (क्र. टी.एस. ३४ ई ३७६८) कुटुंबीयांसह तेलंगण-शिर्डी असा प्रवास करत होते. १३ जानेवारी २०२१ रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास वाशी येथील इंदापूर फाटा पोहेचले असता त्यांच्या कारसमोर कोणीतरी अचानक जॅक फेकल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार रस्त्याच्या बाजुला खड्ड्यात जाऊन उलटली. यावेळी कारमधील केतावत यांच्यासह त्यांचे कुटुंबीय जखमी झाले. त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने तीन ते चार अनोळखी पुरुषांनी केतावत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून केतावत यांच्या आई व बहिणीच्या गळ्यातील एकूण ७५ ग्रॅम सुवर्ण दागिने जबरीने काढून घेत पसार झाले. यावर नवीन केतावत यांनी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. तपासादरम्यान पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलिस अधिकारी डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दळवे, पोलिस उपनिरीक्षक काळे, फंड, पोलिस नाईक पठाण, लाटे, पोलिस कॉन्स्टेबल सय्यद, करवर, सुरवसे यांच्या पथकाने आरोपी प्रकाश नाना पवार उर्फ ढाण्या (रा. पारधी पिढी, तेरखेडा) याला २३ जून रोजी राहत्या परिसरातून अटक केली. गुन्ह्यातील त्याच्या उर्वरित साथीदारांच्या शोधात पाेलिस असून पोलिस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

 
Top