उस्मानाबाद / प्रतिनिधी-

चाकूचा धाक दाखवून जबरी चाेरी, दरवाज्याचा कडी काेयंडा ताेडून दागिन्यांसह राेख रक्कम लंपास करणारा अाराेपी पाेलिसांच्या ताब्यात असून चाेरीचे ३५ ग्रॅम दागिने व ७ हजार रुपयांसह दुचाकी जप्त केल्या अाहेत.

तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील विजय भास्करराव पाटील हे २२ एप्रिल २०२२ रोजी आपल्या घरात झोपले असताना अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या घराची कडी उघडून घरात प्रवेश केला. विजय यांच्यासह त्यांच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवून विजय यांच्या पत्नीच्या अंगावरील व घरातील ३५ ग्रॅम सुवर्ण दागिने, चांदीचे दागिने, वस्तू व ५३ हजार रुपये जबरीने चोरुन नेले होते. दुसऱ्या घटनेत तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्रणिता मुक्तेश्वर कबाडे यांच्या घराचा कडी-कोयंडा अज्ञात व्यक्तीने २२ एप्रिल २०२२ रोजी उचकटून घरातील २५ हजार रुपये, चांदीच्या वस्तू तर गावातील डॉ. प्रशांत सिद्रमप्पा झंगे यांच्या दवाखान्याच्या तिजोरीतील ७ हजार, दीपक कार्ले यांच्या प्रयोगशाळेतील तिजोरीतील ६० हजार रुपये चोरुन नेले होते. यावरुन विजय पाटील, प्रणिता कबाडे यांच्या माहितीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले होते. तपासात पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलिस निरीक्षक शैलेश पवार, पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रकाश औताडे, महेबुब अरब, पोलिस नाईक, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, शैला टेळे, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र आरसेवाड, साईनाथ आशमोड, सहाणे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी अजय सुनिल भोसले (रा. धनेगाव, ता. तुळजापूर) यास २२ जून रोजी धनेगाव शिवारातून ताब्यात घेतले.

वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील ३५ ग्रॅम सुवर्ण दागिने, ७ हजार रुपये तसेच बजाज पल्सर, होंडा शाईन व हिरो स्प्लेंडर या तीन दुचाकी जप्त केल्या.

या तीन दुचाकींचे इंजिन व सांगाडा क्रमांकाच्या आधारे माहिती घेतली असता सदर दुचाकी पुणे जिल्ह्यातून चोरीस गेल्यावरून तेथील खेड पोलिस ठाण्यात, चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुणे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यास कळवले असून आरोपीस पुढील कारवाईसाठी नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

 
Top