उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नैसर्गिक विधीसाठी उसाच्या शेतात गेलेल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास उस्मानाबाद येथील विशेष (पोक्सो) न्यायाधीश सतीश डी.जगताप यांनी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ४ जून रोजी सुनावली आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका गावात २५ जून २०१८ मध्ये घडली होती.

या प्रकरणाची विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी दिलेली माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका गावातील एक १३ वर्षाची अल्पवयीन मुलगी २५ जून २०१८ रोजी शाळेतून घरी आल्यानंतर गावाच्या बाहेर महामार्गालगत असलेल्या उसाच्या शेतात नैसर्गिक विधीसाठी एकटी गेली होती. त्या ठिकाणी एक अनोळखी माणूस आला व त्याने तिला मारहाण करून, तिचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितली तर जिवंत मारण्याची व तिची जिंदगी खराब करण्याची व तुझे सोबत कोणीही लग्न करणार नाही अशी धमकी दिली होती. 

या प्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा कलम ३४६ (३), ३२३ भादवि व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस निरिक्षक राजेंद्र बोकडे यांनी केला.

प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, घटनास्थळाच्या बाजूस असलेल्या पानटपरी चालकाने घटनेच्या वेळी आरोपीला त्याचे वाहन रस्त्यावर लावून पाण्याची बाटली घेवून उसात गेल्याचे व काही वेळाने तीच व्यक्ती धावतपळत येवून पिकअप वाहन चालू करून तुळजापूर शहराकडे गेल्याचे पाहिले होते. तसचे घटनेच्या वेळी महामार्गावर लाईट खांबावर काम करीत असलेल्या दोन साक्षीदारांनी एक व्यक्ती पिकअप वाहन थांबवून उसात गेल्याचे व त्या ठिकाणी एका मुलीला उचलल्याचे या साक्षीदारांकडून निष्पन्न झाले. साक्षीदार व पिडीत मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून अनोळखी आरोपीचे स्केच तयार करण्यात आले. पुढील तपासात पीएसआय डी.डी.बनसोडे यांनी सोलापूर येथून आरोपीचा शोध घेवून आरोपी व पिकअप वाहन ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपीचे नाव विलास कोंडीबा गलांडे (रा. माण ता. सातारा) असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीची अति.कार्यकारी दंडाधिकारी यांच्यामार्फत ओळख परेड घेतली असता आरोपीस पिडीत मुलीने ओळखल्याने तिच्यावर अत्याचार करणारा हाच माणूस आरोपी आहे असे निष्पन्न झाले. पुढील तपासात आरोपीच्या मोबाईल नंबरचे लोकेशन हे घटनेच्या वेळी घटनास्थळावरील असल्याचे निष्पन्न झाले. पिडीत मुलगी ही अनु.जातीची असल्याने गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर प्रकरणाची सुनावणी विशेष पोक्सो न्यायाधिश सतीष जगताप यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस नाईक वनीता वाघमारे यांनी सहकार्य केले. साक्षीदारामध्ये पिडीता, पिडीतेची आज्जी, आरोपीस घटनेपूर्वी व घटनेनंतर पाहणारे साक्षीदार, आरोपीची ओळख परेड घेणारे अति.कार्यकारी दंडाधिकारी, मोबाईल कंपनीचे नोडल ऑफीसर यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. न्यायालयाने विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी विलास कोंडीबा गलांडे यास कलम ३७६ (३) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ नुसार दोषी धरून २० वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंड तसेच कलम ३२३ अन्वये दोन वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ४ जून रोजी सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत.

 
Top