उस्मानाबाद /प्रतिनिधी - 

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर घेण्याची न्यायालयीन लढाई शिवसेना आमदार तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ साखर समूहाने जिंकली आहे. डीआरटी कोर्टाने (कर्ज वसुली न्यायाधिकरण ) ने तेरणा कारखानाबाबत ट्वेंटीवन  शुगरची याचिका फेटाळली असून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने राबविलेली निविदा प्रक्रिया कायदेशीर ठरवत भैरवनाथ उद्योग समूहाला दिलेले टेंडर योग्य असल्याचा निकाल दिला आहे. या निकालामुळे भैरवनाथ समूहाला तेरणा कारखान्याचा ताबा देणे शक्य होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने 25 नोव्हेंबर 2021 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेत आगामी 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भैरवनाथ समूहाला भाडेतत्वावर दिला आहे.

उच्च न्यायालय नंतर डीआरटी कोर्टात त्यानंतर पुन्हा उच्च न्यायालय व डीआरटी कोर्ट असा कायदेशीर लढा भैरवनाथने जिंकला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाचा चेंडू डीआरटी कोर्टात गेला होता त्यावर निकाल देण्यात आला आहे.औरंगाबाद उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरु असताना तेरणाची पुन्हा निविदा काढण्याचा व भैरवनाथ यांना त्यांनी भरलेली 5 कोटी रुपयांची रक्कम 8 टक्के दराने परत करण्याचा डीआरटी कोर्टचा आदेश उच्च न्यायलयाने रद्द केला होता.अनावश्यक बाबीवर चर्चा टाळून जिल्हा बँक, भैरवनाथ उद्योग समूह व ट्वेंटीवन उद्योग समूह या तिन्ही पक्षानी मांडलेल्या बाबीवर सुनावणी घ्या असे आदेश दिले होते त्यानंतर हे प्रकरण डीआरटी कोर्टत सुनावणीसाठी गेले होते.

तेरणा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियाचा वाद ट्वेंटीवन शुगरने डीआरटी कोर्टात (कर्ज वसुली न्यायाधिकरण) दाखल केला होता. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तेरणा कारखाना शिवसेना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ उद्योगसमूहला 25 वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली आहे.

 
Top