उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रंगमंचावर पडदा पडल्यावर जसे पात्र बदलतात तसेच आता जैवविविधतेच्या  व पर्यावरणाच्या बाबतीत झाले आहे. जैवविविधतेच्या मंचावरील पात्र आता बदलले आहे, आजपर्यंत आपण नैसर्गिक संसाधनाचा उपभोग घेतला व विकासाच्या नावाखाली जंगल तोड मोठ्या प्रमाणावर केली, यामुळे आता जमिनीची धूप होणे, तापमानात वाढ होणे , अनियमित पावसाळा व पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. आता रंगमंचावरील या दृश्यात  वृक्ष लागवड करून निसर्गापुढे उपहार तयार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन श्री अशोक चव्हाण यांनी  केले. ते कृषी महाविद्यालय आळणी ( गड पाटी) उस्मानाबाद येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत “माझी वसुंधरा अभियानाच्या” पार्श्वभूमीवर राबवण्यात येत असलेल्या ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताहाच्या’ उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

विद्यार्थी हा देशाच्या विकासातील महत्त्वाचा पैलू असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षणी आव्हान पेलण्यासाठी सजग राहिले पाहिजे व नेहमी मी जिंकणारच अशा आत्मविश्वासाने संकटाचा सामना केला पाहिजे. स्वतः यशस्वी होत असताना पर्यावरण संवर्धन यामध्ये आपला हातभार लावला पाहिजे ; जर विद्यार्थ्यांनी ठरवले तर भारत देश सुजलाम - सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले पुढे आपल्या व्याख्यानात ते म्हणाले की, मानवाने निसर्गाप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे , कारण मृत्यूपश्चात आपल्याकडे मृतदेहाला जाळण्याची प्रथा आहे. निदान स्वतःला जाळण्याइतपत लागणाऱ्या लाकडा एवढ्या तरी वृक्षाची लागवड उभ्या आयुष्यात करण्याची तयारी असावीअसे हृदय स्पर्शी आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय दिगंबर फडणीस यांनी या वेळी हरित परिसर ठेवण्याची विद्यार्थ्यांना शपथ दिली तर स्वच्छता सप्ताहाची सुरुवात वैयक्तिक स्वच्छतेपासून विद्यार्थ्यांनी करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांना असे प्रतिपादन केले की आपण निसर्गाकडून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लागणारी प्रत्येक गोष्ट घेतो तर आपण निसर्गाचे ऋणी आहोत; म्हणून पर्यावरण संवर्धन ही आपली स्वतःची जबाबदारी आहे व ते आद्यकर्तव्य आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडच नाही तर वृक्ष संवर्धनावरती भर द्यावा. वर्षानुवर्ष वृक्ष लागवड होत आहे परंतु वृक्षसंवर्धन हा प्रश्न गंभीर होत चालला आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री सुतारएन.एस. यांनी तर प्रास्ताविक प्रा.श्री  बंडे के.डी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. के. ए.  बुरगुटे यांनी केले.

यावेळी प्रा.फडतरे, प्रा.सचिन खताळ, प्रा.शेटे डी.एस., प्रा.भालेकर एस. व्ही., प्रा. बुरगुटे के. ए., प्रा.गायकवाड पी.ए., प्रा.गार्डी ए. जि., प्रा.साठे एम.पी. प्रा.जगधाने एस.एम., प्रा. नागरगोजे व्ही. टी., प्रा.दळवी सतीश व प्रा.श्रीमती पाटील एस.एन, प्रा.साबळे एस.एन, प्रा. वाकळे ए.जी. प्रा.आर.एस.पठाण  हे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापक प्रा.हरी घाडगे, सुतार रामचंद्र, गुलाब मुजावर, गावठे दत्तात्रय यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन व रूपरेषा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक कालिदास बंडे आणि 4थ्या सत्रातील विद्यार्थ्यांनी  पार पाडली.


 
Top