उस्मानाबाद / प्रतिनिधी-

२०११ च्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार १७ टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली भूक व गरिबीच्या खाईत जीवन जगत आहे. तर शहरातील २५ टक्के लोकसंख्या झोपडीत राहते. ही विषमता कमी करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा. तसेच गरिबी निर्मूलन करण्यासाठी विशेष कायदा करण्यात यावा, अशी मागणी गरीबी निर्मूलन समितीच्यावतीने मुख्यमंत्र्याकडे एका निवेदनाद्वारे दि.७ मे रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील रोज घडणाऱ्या गोरगरिबांच्या आत्महत्या अपघात दुर्घटना यातून शेकडो जणांचे होणारे मृत्यू पाहतात. त्यातच वाढती महागाई बेरोजगारी हाताला काम नसल्यामुळे उदाहरणे चालविण्याचा, चालवायचा कसा ? या विवंचनेत आज राज्यातील लाखो कुटूंबे असून भुकेलेल्या पोटाची खळगी भरण्याची भ्रांत निर्माण झालेले आदिवासी, शेतात राबणारे शेतकरी, मजूर, सुशिक्षित बेकार व इतर गळफास लावून तर कधी विष घेऊन स्वतःला व कुटुंबाला मृत्यूच्या खाईत ढकलीत आहेत. त्यामुळे याचा सखोल विचार करून शैक्षणिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या प्रगतशील करण्यासाठी प्रयत्न करावेत. तर गरीबी निर्मूलन करण्यासाठी बजेटची तरतूद करण्यात यावी. तसेच राज्यातील गरीब कुटुंबाकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्यामुळे व वाढत्या महागाईत तुटपुंज्या मोलमजुरीवर उदरनिर्वाह करणे कठीण बनले असल्यामुळे मासिक ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तर राज्य स्तरावर विविध कल्याणकारी योजनांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा. तसेच महागाई निर्देशांकानुसार मजूर स्त्री व पुरुषांना किमान समान मजुरी १ हजार रुपये करण्यात यावी. तर कामगारांना मध्यान्ह भोजन देण्याऐवजी रेशनवर कामगार व गरिबांना गहू व तांदूळ दोन्ही मिळून ७५ किलो धान्य देण्यात यावे. तसेच गरिबांच्या व्यथा वेदना समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी गरिबी निर्मूलन तक्रार निवारण कक्ष प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यात यावे. तर गरिबांच्या मुला-मुलींना पूर्वीप्रमाणे शालेय साहित्य व गणवेश वर्षातून २ वेळा देण्यात यावे. तर कामगारांच्या पाल्यांची थकित शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी. तसेच या कामगारांचे पूर्वी दाखल केलेल्या ऑनलाईन अर्जाची पोहोच पावती व पासबुक देण्यात यावे. तसेच खाद्यतेल व अन्नधान्याचे भाव कमी करण्यात येऊन घर वापराच्या गॅसच्या किंमती पूर्वीसारख्या स्थिर ठेवण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष भाई फुलचंद गायकवाड, मराठवाडा अध्यक्ष अशोक बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल औटे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष आप्पासाहेब मस्के, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष राधा शिंगाडे, जिल्हा संघटक महेबुब शेख व समाधान कांबळे आदींच्या सह्या आहेत.


 
Top