उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील गजबजलेले ठिकाण असलेल्या झाडे गल्लीच्या परिसरात भर दिवसा म्हणजे सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान एका घरात घुसून चोरट्यांनी तब्बल ३७ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसत असून नवीन पोलिस अधीक्षकांसमोर चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे.

शहरातील निंबाळकर गल्ली ते झाडे गल्ली दरम्यान महावीर क्लाथ स्टोअर्सच्या समोर बोळ आले. हा भाग सातत्याने गजबजलेला असतो. सायंकाळच्या दरम्यान तर मोठ्या प्रमाणात नागरिक कपडे व अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी या भागात असतात. याच बोळीमध्ये औषध विक्रीचे दुचाक चालवणाऱ्या रेखा बाळासाहेब पवार यांचे निवासस्थान आहे. त्या पती व मुलांसह घरास कुलुप लाऊन रविवारी बाहेर गावी गेल्या होत्या. त्यावेळी लख्ख प्रकाश असताना चोरट्याने धाडसी चोरी केली. त्याने घराचे कुलुप तोडुन आतमध्ये प्रवेश्‍ा केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडुन त्यामधील ३७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अलगद लंपास केले. पोलिसांनी या परिसराचा कसून तपास केला. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. परंतु, काहीच उपयोग झाला नाही. चोरट्याने ऐन गजबजलेल्या ठिकाणी थेट दिवस असताना चोरी करण्याचे धाडस केले. यावरून चोरट्यांचे धाडस पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे. नवीन पोलिस अधिक्षकांसमोर चाेरट्याने आव्हान निर्माण केले असून याप्रकरणाचा तातडीने छडा लावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा चोरटे पुन्हा असे धाडस करण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 
Top