उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन अनेकांचे रोजगार बुडाले. काहींच्या नोक-या गेल्या तर लघु आणि मध्यम व्यवसाय बंद झाले. यावर मात करण्यासाठी गरजु आणि होतकरू उमेदवारांकरीता स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव अंतर्गत  महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभाग आणि  जिल्हा प्रशासन तसेच युथ एड फाऊंडेशन पुणे  यांच्या संयुक्त विद्यमाने 10 जून ते 12 जून 2022 या कालावधीत उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे..

या यात्रेचे व जिल्हा स्वयंरोजगार मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवार दि.10 जून 2022 रोजी सकाळी 10.00 वा. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाजकल्याणच्या सभागृहात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत होणा-या या प्रशिक्षण शिबिरात महिला व युवकांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देऊन तज्ज्ञ मंडळीकडून उद्योगाबाबत मार्गदर्शन होणार आहे. यात व्यवसायाचे नियोजन करणे, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची ओळख करून देणे, त्यासाठी लागणा-या अटींची पुर्तता करण्यासाठी मार्गदर्शन करणे,आर्थिक तसेच डीजीटल साक्षर करणे, व्यवसायाचे पर्याय सुचविणे, व्यवसायासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या संधीबाबत माहिती देणे तसेच नवीन व्यावसायिकांना बीज भांडवल योजनेबाबत मार्गदर्शन करणे तसेच स्वयंरोजगार मेळावा आदींचा समावेश आहे. कौशल्य विकास विभागाच्या वतीने राज्यभर उद्यमिता यात्रा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गरजू आणि होतकरू उमेदवारांनी सहभाग नोंदवण्याकरिता जिल्हा समन्वयक दत्तात्रय कांबळे, मोहम्मद रिझवान कपूर  यांच्याशी दूरध्वनी क्रमांक (02472) 299434  वर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र संजय रा.गुरव यांनी केले आहे.

 
Top