उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जागतीक आरोग्य संघटनेने प्रत्येक गरोदर मातेची किमान 8 वेळा तपासणी करण्याबाबत सुचविले आहे. या अनुषंगाने गरोदर मातांची तपासणी ही प्रशिक्षीत वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्फत होणे आवश्यक असल्याने दरमहा 1 तारखेस प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (संपूर्ण देशात) आणि 22 तारखेस मातृत्व संबर्धन दिन (फक्त उस्मानाबाद जिल्हयात) हा जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राबविला जातो. परंतु या दिवशी प्रत्येक गावातील किंवा उपकेंद्रातील सर्व मातांना प्रा.आ.केंद्र स्तरावर तपासणी साठी जाणे शक्य होत नाही. यासाठी उपकेंद्र आणि ग्रामस्तरावर गुणवत्तापुर्ण आरोग्य तापसणी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

या बाबत माहिती देताना जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सांगीतले की, या करीता जिल्हयातील प्रत्येक गावातील प्रत्येक गरोदर मातेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी प्रतीमाह प्रत्येक उपकेंद्र स्तरावर “आरोग्य वर्धिनी मातृत्व दिन” तसेच ग्रामस्तरावर “ग्राम मातृत्व दिन” केवळ गरोदर मातांच्या निगडीत सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा आणि राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्याकरीता एक दिवस निश्चित करून त्यामधून प्रत्येक गावातील सर्व गरोदर मातांना उपकेंद्र स्तरावर प्रा.आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी मार्फत आणि ग्रामस्तरावर आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्फत तपासणी आणि इतर अनुषंगीक सेवा देण्यात येणार आहेत. या सोबतच प्रयोगशाळेच्या सर्व तपासण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच गरोदर मातांना प्रसुती दरम्यान घ्यावयाची काळजी, पुरक सकस आणि चौरस आहार याबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे. लाभार्थी गरोदर मातांना ने-आण करण्यासाठी जननी शिशु सुरक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रा.आ.केंद्राच्या वाहनाचा लाभ ही देण्यात येणार आहे. उपरोक्त प्रमाणे उपकेंद्र स्तरावर “आरोग्य वर्धिनी मातृत्व दिन” तसेच ग्रामस्तरावर “ग्राम मातृत्व दिन” हे उपक्रम राबविण्यामागे जिल्हयातील मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे तसेच निरोगी आणि सदृढ बालक जन्माला येणे हा या मागे उद्देश्य ठेवण्यात आलेला आहे. तसेच गरोदर मातांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा जास्तीत जास्त देणे, जोखमीच्या माता वेळेतच ओळखून त्याचे व्यवस्थापन करणे, संस्थात्मक प्रसुती वाढविणे आणि एकंदर मातामृत्यू व बालमृत्यू टाळणे हा उद्देश्य ठेवण्यात आलेला आहे.

उपकेंद्र स्तरावर “आरोग्य वर्धिनी मातृत्व दिन” तसेच ग्रामस्तरावर “ग्राम मातृत्व दिन” याचा जास्तीत जास्त गरोदर मातांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी  राहूल गुप्ता यांनी केले आहे.

 
Top