उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र सरकारच्या पंजाबराव देशमुख योजनेला केंद्र सरकारकडून मिळणारे 5 टक्के अर्थसाह्य पूर्ववत देण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवतजी कराड  यांच्याकडे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे   खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील चार आकांक्षित जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद हा एक जिल्हा आहे. मराठवाड्यातील मागासलेला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. सततच्या दुष्काळामुळे येथील शेतकऱ्‍यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळेच शेतकऱ्‍यांचे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करता येत नसल्यामुळे आर्थिक समस्येचा ताण वाढतो. त्यामुळे पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत शेतकऱ्‍यांना दिलासा मिळाला होता. शेतकऱ्‍यांना विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जावर केंद्र सरकारकडून पाच टक्के अर्थसाह्य मिळत होते. परंतु केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अर्थसाह्यात दोन टक्क्यांची घट होऊन सध्या फक्त तीन टक्के अर्थसाह्य मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे 3 आणि राज्य सरकारचे 3 टक्के अर्थसाह्य शेतकऱ्‍यांना मिळत आहे. म्हणून पूर्वीप्रमाणे 5 टक्के अर्थसाह्याची तरतूद केल्यास सर्वसामान्य शेतकऱ्‍यांना त्याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्‍यांसाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण असून पूर्वीप्रमाणे 5 टक्के अर्थसाह्य मिळाल्यास शेतकऱ्‍यांना त्याचा लाभ होण्याबरोबर बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत होईल. त्यामुळे पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसाह्य पूर्वीप्रमाणे 5 टक्के ठेवण्याबाबत उचित निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा घाडगे-पाटील यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. त्या अनुषंगाने विविध मागण्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवतजी कराड साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, शहरप्रमुख संजय मुंडे, न. प. गटनेते सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, सिद्धेश्वर कोळी, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, पंकज पाटील, अभिजीत देशमुख, दिलीप जावळे, बंडू आदरकर, सुरेश गवळी, विजय ढोणे, हनुमंत देवकते, मुकेश पाटील, गणेश असलेकर, धनंजय इंगळे, मनोहर धोंगडे, अजय धोंगडे, राकेश सूर्यवंशी, सत्यजीत पडवळ, शिवयोगी चपने, शिवप्रताप कोळी, भीमा जाधव, महेश लिमये, योगेश जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top