उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील गाळपा अभावी शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी शासनाने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यामार्फत ऊस गाळपासाठी नेण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी सौंदना, लोहटा पूर्व, दाभा, हिंगणगाव, करंजकल्ला, खडकी, लोहटा पश्चिम, शिराढोण, आवाड शिरपुरा, वाकडी, रांजणी आदि गावांना भेटी देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पीक विमा, खत पुरवठा याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली. व ऊस गाळपाबाबत सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मांजरा नदी पात्रालगतच्या पट्ट्यात उसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यावर्षी मोठ्या पावसामुळे ऊसाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. या पट्ट्यातील ऊस गाळपाअभावी शेतात ऊभा आहे. तसेच या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला रांजणी कारखाना काही तांत्रिक बिघाडामुळे कमी क्षमतेने चालल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस अजूनही शेतात ऊभा आहे. यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत, गाठीभेटी घेत श्री. दुधगावकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व शिल्लक ऊस गाळपासाठी पाऊस पडेपर्यंत साखर कारखाने शासन चालू ठेवणार आहे,असे आश्वासित करुन शेतकऱ्यांनी भितीने कुठल्याही प्रकारचे टोकाचे निर्णय घेऊ नयेतअसे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे आश्वासन दिले.

यावेळी त्यांनी रांजणी येथील शेतकरी हबीबखाँ पठाण, राजाभाऊ शंकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच सद्गुरु सामनगावकर महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत प्रकाश मुंदडा, बबनराव काळदाते, गोविंद आवाड, विनायक कवडे, शाहूराज खोसे, अरुण पवार, सुरेश टोणगे, काका अडसूळ, महावीर शंकर, संदीप मोरे, उत्रेश्वर माने,गणेश अडसुळ, बबन काळदाते, गोविंद आवाड, चांगदेव माळकर, गणेश मोरे, संजय अभंग, दिलीप राकुंडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top